esakal | विजयासाठीचे विराट प्रयत्न अपुरे
sakal

बोलून बातमी शोधा

विजयासाठीचे विराट प्रयत्न अपुरे

विजयासाठीचे विराट प्रयत्न अपुरे

sakal_logo
By
पीटीआय

कोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या  विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेने अडखळत, धापा टाकत का होईना पण यश मिळवले. अपुऱ्या प्रकाशाची त्यांना साथ मिळाली.

पहिल्या दोन दिवसांत पावसाचा खेळ झाला. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत श्रीलंकेची निर्विवाद हुकमत होती; पण अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात शमीने वेगवान मारा करताना वेगाने षटकेही पूर्ण करीत श्रीलंकेवरील दबाव वाढवला; पण अखेर अपुरा प्रकाश श्रीलंकेच्या मदतीस आला. चहापानापूर्वी श्रीलंका सलामीवीरांनी सहज सोडता येणाऱ्या चेंडूचा पाठलाग करीत विकेट गमावल्या आणि भारताचा आत्मविश्‍वास उंचावला.

खेळपट्टीवरून चेंडू चांगला मूव्ह होत होता, त्यास अचूकतेची जोड देत भारतीयांनी पहिल्या डावातील अर्धशतकवीर एंजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू थिरिमन्ने यांनाही झटपट टिपले. दिनेश चंडीमल आणि निरोशन डिकवेलाने प्रतिहल्ला करीत भारतीयांची एकाग्रता भंग केली. तापलेले वातावरण पंचांनी हस्तक्षेप करीत शांत केले; पण त्यानंतर भारतीय अधिक अचूक आणि तिखट झाले. भुवनेश्‍वर तसेच शमीने चेंडूच्या मूव्हमेंट तसेच गतीत बदल करीत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. २८ चेंडूंत तीन विकेट गेल्या होत्या; पण अपुरा प्रकाश श्रीलंकेच्या मदतीस धावून आला.

भारतास विजयी कळस खुणावू लागला होता, तर त्याचा पाया विराट कोहलीने सकाळच्या सत्रात रचला होता. भोपळा फोडण्यापूर्वीच तो वाचला होता; पण त्यानंतर सहकारी धावांसाठी झगडत असताना त्याने प्रतिहल्ला केला. श्रीलंका गोलंदाजांनीही स्वैर मारा करीत त्याला साह्यच केले. श्रीलंका गोलंदाजांचा चेंडू अपेक्षित स्विंग होत नव्हता, त्याचा फायदा कोहली पुरेपूर घेत होता. त्यातच त्याने त्याच्याविरुद्धचा पायचीतचा निर्णय रिव्ह्यूची मदत घेत फिरवला. त्याच्या प्रतिआक्रमणाने राहुल, पुजारा यांना सकाळच्या सत्रात झटपट बाद केल्याचा श्रीलंकेचा आनंद फार वेळ टिकला नाही.

खरे तर रहाणे, पुजारा, राहुल हे झटपट बाद झाले. त्या वेळी श्रीलंकेला विजय खुणावत होता; पण भारतीय मायदेशात ऐनवेळी सामना फिरवतात, याची प्रचीती श्रीलंकेच्या खेळाडूंना आली.

धावफलक
भारत, पहिला डाव - १७२.
श्रीलंका, पहिला डाव - २९४. 

भारत, दुसरा डाव - केएल राहुल त्रि. गो. लकमल ७९, शिखर धवन झे. डिकवेला गो. शनाका ९४, चेतेश्‍वर पुजारा झे. परेरा गो. लकमल २२, विराट कोहली नाबाद १०४ (११९ चेंडू, १२ चौकार, २ षटकार), अजिंक्‍य रहाणे पायचीत गो. लकमल ०, रवींद्र जडेजा झे. थिरिमन्ने गो. पेरेरा ९, आर. अश्‍विन त्रि. गो. शनाका ७, वृद्धीमान साहा झे. समरविक्रमा गो. शनाका ५, भुवनेश्‍वर कुमार झे. पेरेरा गो. गामागे ८, महंमद शमी नाबाद १२, अवांतर ः १२, एकूण ः ८८.४ षटकांत ८ बाद ३५२ घोषित. 

बाद क्रम - १-१६६, २-१९२, ३-२१३, ४-२१३, ५-२४९, ६-२६९, ७-२८१, ८-३२१.

गोलंदाजी - लकमल २४.४-४-९३-३, गमगे २३-२-९७-१, शनाका २२-१-७६-३, पेरेरा १३-२-४९-१, हेराथ ६-१-२९-०.

श्रीलंका, दुसरा डाव ः समरविक्रमा त्रि. गो. भुवनेश्‍वर ०, करुणारत्ने त्रि. गो. शमी १, थिरिमन्ने झे. रहाणे गो. भुवनेश्‍वर ७, मॅथ्युज पायचीत गो. यादव १२, चंडीमल त्रि.गो. शमी २०, डिकवेला पायचीत गो. भुवनेश्‍वर २७, शनाका नाबाद ६, पेरेरा त्रि. गो. भुवनेश्‍वर ०, हेराथ नाबाद ०, अवांतर ः २, एकूण ः २६.३ षटकांत ७ बाद ७५.

बाद क्रम - १-०, २-२, ३-१४, ४-२२, ५-६९, ६-६९, ७-७५.

गोलंदाजी - भुवनेश्‍वर कुमार ११-८-८-४, महंद शमी ९.३-४-३४-२, उमेश यादव ५-०-२५-१, रवींद्र जडेजा १-०-७-०

कोहलीचे अर्धशतक
 कोहलीचे तिसऱ्या डावातील हे दुसरे शतक. ही दोन्ही शतके श्रीलंकेविरुद्ध. 
 कोहलीचे पहिले शतक या वर्षाच्या सुरवातीस होते. त्यापूर्वी ही कामगिरी करणारा भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकर (१९९९) होता; तर यापूर्वीचा फलंदाज राहुल द्रवीड (२००५) होता.
कोहलीने या शतकापूर्वीच्या ईडन गार्डनवरील सहा कसोटींत मिळून ८३ धावा केल्या होत्या.
कोहलीचे हे १८ वे कसोटी शतक, तसेच सर्वांत वेगवान कसोटी शतकही. 
कोहलीचे या वेळी शतक ११९ चेंडूंत; तर यापूर्वीचे सर्वांत वेगवान शतक १२९ चेंडूंत न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनला.
मैदानात आल्यापासूनच्या ६८.८७ टक्के धावा कोहलीच्या. कोहलीने ११९ चेंडूंत १०४ धावा केल्या; तर त्याच्या सहकाऱ्यांनी १४७ चेंडूंत ४७.
कोहलीचे यंदाचे हे नववे शतक.
एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याच्या कर्णधारांच्या क्रमवारीत आता संयुक्त अव्वल. रिकी पाँटिंग व ग्रॅमी स्मिथ यांच्याकडून ही कामगिरी.
एकाच कसोटीत भोपळा आणि शतक ही कामगिरी केलेला कोहली हा पहिला भारतीय कर्णधार; तर यापूर्वीचा भारतीय फलंदाज चेतेश्‍वर पुजारा (२०१५, वि. श्रीलंकाच).

loading image