esakal | धोनी करणार चेन्नईचेच प्रतिनिधित्व
sakal

बोलून बातमी शोधा

धोनी करणार चेन्नईचेच प्रतिनिधित्व

धोनी करणार चेन्नईचेच प्रतिनिधित्व

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करताना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल या दोन फ्रॅंचाइजींसह अन्य फ्रॅंचाइजी पाच खेळाडू कायम ठेवू शकणार आहेत. यामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. 

दहा वर्षांचा करार संपल्यानंतर आगामी ‘आयपीएल’ स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार होता. काही खेळाडू कायम ठेवण्याची फ्रॅंचाइजींनी केलेली विनंती मान्य करताना ‘आयपीएल’ कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला. आयपीएल कार्यकारी समिती, प्रशासकीय समिती आणि फ्रॅंचाइजी मालक यांच्यात आज झालेल्या बैठकीत खेळाडूंच्या कायम ठेवण्याविषयाबरोबरच, मानधन, नियमावली याविषयांवर चर्चा करण्यात आली. चेन्नई आणि राजस्थान या दोन फ्रॅंचाइजींवर २०१५ नंतर दोन वर्षांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नव्या मोसमात आयपीएल आठ संघांतच खेळविण्याचा निर्णय झाल्यामुळे या दोन्ही फ्रॅंचाइजींचा मार्ग मोकळा झाला होता.

या दोन फ्रॅंचाइजी संघांच्या खेळाडू कायम ठेवण्याविषयी निर्णय घेताना त्यांनी तीन खेळाडूंची परवानगी देण्यात आली. मात्र, हे तीन खेळाडू अन्य कुठल्या  संघातून खेळलेले नसावेत, अशी अट टाकण्यात आली. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईकडून खेळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.

पाच खेळाडू कायम राहणार 
सर्व फ्रॅंचाइजींना पाच खेळाडू कायम ठेवण्याची सवलत आहे. यात तीन खेळाडू कायम ठेवणे आणि दोन मॅचिंग कार्ड किंवा दोन खेळाडू कायम ठेवणे आणि तीन मॅचिंग कार्डस असे दोन पर्याय आहेत. त्याच वेळी यातील तीन खेळाडू भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंचे बंधन आले आहे. खेळाडू कायम ठेवण्यात रस नसेल, तर लिलावात तीन मॅचिंग कार्डस मिळणार आहेत.

मानधनात वाढ
खेळाडूंच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ दरवर्षी होईल. त्यानुसार २०१८ साठी ८० कोटी, २०१९साठी ८२ आणि २०२० साठी ८५ कोटी वाढ देण्यात आली आहे. नवोदित खेळाडूंसाठी फ्रॅंचाइजी प्रत्येक मोसमासाठी ७५ टक्के रक्कम खर्च करू शकते. 

थोडक्‍यात निर्णय
     फ्रॅंचाइजी किमान २५ आणि कमाल १८ खेळाडूंची निवड करू शकते. (आठ परदेशी खेळाडू आवश्‍यक)
     नवोदित खेळाडूस मिळणार किमान ४० लाख

फ्रॅंचाइजींची कोणाला मिळणार पसंती
     चेन्नई - महेंद्रसिंह धोनी, ड्‌वेन ब्राव्हो
     मुंबई - रोहित शर्मा, किएरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमरा, पंड्या बंधू (हार्दिक आणि कृणाल)
     बंगळूर - विराट कोहली, एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल
     दिल्ली - कायम ठेवण्यासाठी पसंती देण्याची शक्‍यता कमी
     हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्‍वरकुमार

loading image