द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

अनिल कुंबळे यांच्यानंतर आता द्रविड आणि झहीरला देण्यात येत असलेली वागणूक लज्जास्पद आहे.
- रामचंद्र गुहा.

नवी दिल्ली - टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ निवडताना गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल क्रिकेट प्रशासकीय समितीचेच माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी खडे बोल सुनावले आहेत. अगोदर अनिल कुंबळे, आता राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या उघडपणे होत असलेल्या मानहानीबद्दल गुहा यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली.

कुंबळे, झहीर आणि राहुल द्रविड हे ग्रेट खेळाडू आहेत. त्यांनी मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रतिमेची अशी मानहानी करणे योग्य नाही. त्यांना देण्यात येत असलेली वागणूक लज्जास्पद आहे, असे गुहा यांनी म्हटले आहे. कुंबळे प्रकरणामुळे नाराज होऊन गुहा यांनी प्रशासक समितीचा राजीनामा दिला आहे.

कुंबळे, झहीरला विरोध?
कर्णधाराला आपण नको असल्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले, त्यानंतर शास्त्री यांची नियुक्ती झाली. त्याच वेळी सचिन-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने द्रविड आणि झहीर यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचा सल्लागार म्हणून शिफारस केली. विशेष करून झहीरच्या नियुक्तीला शास्त्री यांचा विरोध होता. असे असताना काल प्रशासकीय समितीचे शिल्लक असलेले दोन सदस्य राय आणि एडल्जी यांनी द्रविड, झहीर यांची नियुक्ती अजून निश्‍चित नाही. शास्त्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे काल स्पष्ट केले. त्यामुळे गुहा यांचा टीकेचा रोख प्रशासकीय समितीवरही आहे, अशी चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Do not despise Dravid & Zaheer