क्रिकेट माझ्या रक्तातच: विराट कोहली

वृत्तसंस्था
Thursday, 28 December 2017

क्रिकेट हा खेळ सर्वत्र बॅट आणि चेंडूने खेळला जातो, परंतु तुमची मानसिकता किती कणखर असते हे महत्वाचे असते, तुम्ही मनाने तेथे असायला हवे मग पगदेशात खेळत आहात की घरच्या मैदानावर त्याचा काहीच फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर तुम्हाला तेथील संस्कृतीशी आपलीशी करावी लागते; मग तुम्हाला खेळाचा अधिक आनंद मिळतो. 

मुंबई : क्रिकेट माझ्या रक्तात आहे लग्नाच्या मांडवातून क्रिकेटच्या मैदानात लगेचच उतरण्यास मला अडचण येणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करत विराट कोहली टीम इंडियासह दक्षिण आफ्रिका मोहिमेवर निघाला आहे. आफ्रिका दौऱ्यात यश मिळवण्यासाठी सातत्य राखावे लागेल, असे मत त्याने व्यक्त केले. 

अनुष्का शर्माबरोबरच्या विवाहानंतर मुंबईत काल रात्रीपर्यंत स्वागत समारंभ साजरा करणारा विराट 24 तासांच्या आत टीम इंडियाच्या मोहिमेवर निघाला आहे. आज सायंकाळी तो दौऱ्यावर निघण्याच्या पत्रकार परिषदेस उपस्थित होता. 2017 मध्ये मायदेशात घवघवीत यश मिळवणाऱ्या भारताचा नववर्षात परदेशात कस लागणार आहे आणि त्याची सुरवात 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून होणार आहे. 

लग्न आणि स्वागत समारंभ हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग असला आणि त्यामुळे मी क्रिकेटपासून काही दिवस दूर असलो तरी तंदुरुस्तीसंदर्भातला माझा सराव सुरू होता, असे विराटने या पत्रकार परिषदेत सांगितले. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात विचारले असतो तो म्हणतो, हा आव्हानात्मक दौरा आहे, येथे यश मिळवण्यासाठी आम्हाला अधिक काळ चांगला खेळ करावा लागेल. म्हणजेच सातत्य ठेवावे लागेल. चांगल्या कामगिरीची आमची भूक कायम आहे. गेल्या खेपेस जे चांगले करु शकलो नाही ते यंदा करायचे आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. 
कोणासाठी कोणती गोष्ट सिद्ध करण्यासाठी आम्ही दक्षिण आफ्रिकेत जात नाही, आम्ही देशासाठी सर्वस्व बहाल करण्यासाठी आणि 100 टक्के योगदान देण्यासाठी जात आहोत, असे विराटने सांगितले. 

विराट पुढे म्हणतो, क्रिकेट हा खेळ सर्वत्र बॅट आणि चेंडूने खेळला जातो, परंतु तुमची मानसिकता किती कणखर असते हे महत्वाचे असते, तुम्ही मनाने तेथे असायला हवे मग पगदेशात खेळत आहात की घरच्या मैदानावर त्याचा काहीच फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर तुम्हाला तेथील संस्कृतीशी आपलीशी करावी लागते; मग तुम्हाला खेळाचा अधिक आनंद मिळतो. 

संघातील एकूणच वातावरणाचा मला अभिमान आहे. सर्वांमध्ये एक वेगळे नाते तयार झाले आहे. नेहमीच्या जीवनशैलीचेही हे नाते आहे. विनाकारण दडपण घेण्यात काहीच अर्थ नाही. गुणवत्तेनुसार खेळ केला तर यश निश्‍चितच मिळणार आहे, असे भारतीय कर्णधार आत्मविश्‍वाने म्हणाला. 

दक्षिण आफ्रिका दौरा आव्हानात्मक असणार आहे याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. परंतु हीच तर खरी खेळाची मजा असते. या आव्हानाची वाट पाहत आहोत आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची जिद्दही बागळून आहोत. 
-रवी शास्त्री, भारतीय मुख्य प्रशिक्षक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports news Getting married was much more important says Virat Kohli