esakal | ‘ग्रीन टॉप’वर पुन्हा भारतीयांची कसोटी
sakal

बोलून बातमी शोधा

‘ग्रीन टॉप’वर पुन्हा भारतीयांची कसोटी

‘ग्रीन टॉप’वर पुन्हा भारतीयांची कसोटी

sakal_logo
By
सुनंदन लेले

जोहान्सबर्ग - पहिल्या दोन कसोटी सामन्यातच मालिकेचा निर्णय लागला असला, तरी तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेला तिसरा सामनाही जिंकून भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळवायचे आहे, त्याचवेळी भारतीय संघाला आपली प्रतिष्ठा जपायची आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारा मालिकेतील तिसरा सामनाही रंगतदार ठरणार यात शंका नाही. भारतीय संघ प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत असणार तरी, वाँडरर्सची ‘ग्रीन टॉप’ आणि काहीशी टणक खेळपट्टी त्यांच्या क्षमतेची पुन्हा एकवार ‘कसोटी’ पाहणार, यात शंका नाही. 

दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून भारतीय संघाची अडचणींची मालिका वाढली आहे. पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व राखण्याची संधी कमी अधिक प्रमाणात मिळाल्यानंतरही ती साधण्यात भारताला अपयश आले आहे. प्रतिस्पर्धी संघाने मोक्‍याच्या प्रत्येक क्षणी खेळ उंचावला, तर प्रत्येक मोक्‍याच्या क्षणी भारतीय संघाचा खेळ खालावला. आतापर्यंत गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना प्रत्येक वेळी फलंदाजांनी मान खाली घालायला लावली आहे. भारताचे अनुभवी खेळाडू अपयशी ठरत असतानाच यजमान संघाच्या युवा गोलंदाजांनी प्रचंड मेहनत आणि जिगरबाज खेळ करून संघाची ताकद वाढवली आहे. 

खेळपट्टीचे स्वरूप आणि फलंदाजांचा फॉर्म लक्षात घेऊन दोन्ही संघ आपली संघ निवड करतील. दक्षिण आफ्रिका संघाने दोन्ही सामने जिंकले असले तरी, त्यांच्या फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजांनी भंडावून सोडले आहे.

त्यामुळे यजमान संघदेखील भारताची ती ताकद ओळखूनच संघरचना निश्‍चित करतील. वाँडरर्सच्या खेळपट्टीचा इतिहास लक्षात घेता दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाज मॉरिसचा समावेश करू शकते. त्याचवेळी भारतीय संघात अजिंक्‍य रहाणेचा समावेश नक्की मानला जात आहे. अधिक फलंदाज खेळविण्याचा विचार झाल्यास एक गोलंदाज कमी केला जाऊ शकतो; पण तसा विचार न झाल्यास रोहित शर्माला रहाणेसाठी जागा करून द्यावी लागेल. यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक यांच्यात ‘टॉस’ होईल असे वाटते.

दुसऱ्या दिवसापासूनच पावसाचा अंदाज
तिसऱ्या कसोटी सामन्याचे महत्त्व दोन्ही संघांसाठी समान असले तरी, पावसावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पहिल्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार असले तरी, हवामान खात्याने दुसऱ्या दिवसापासूनच पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुसळधार पावसाची शक्‍यता नसली तरी, अधूनमधून पावसाच्या सरी बरसणारच आहेत. त्यामुळे खेळ थांबल्यास त्याचा खेळावर कसा परिणाम होतो, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून राहील.

पहिल्या दोन्ही सामन्यांत आम्ही चांगला खेळ करण्याची संधी दवडली. वर्चस्व गाजवायच्या वेळीच आमचा खेळ उंचावण्याऐवजी खालावला. आता तिसऱ्या कसोटीत जबाबदारी ओळखून खेळ करणे गरजेचे आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांस पूरक अशीच आहे. आमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आता फलंदाजांना साथ देण्याची वेळ आली आहे. खेळपट्टीवरील संयम महत्त्वाचा ठरेल.
- विराट कोहली, भारताचा कर्णधार

पहिल्या दोन्ही विजयांत गोलंदाजांची कामगिरी निर्णायक होती. तुलनेत फलंदाजी चांगली झाली असली तरी समाधानी नाही. भारतीय संघ या मैदानावर अजून हरलेले नाहीत, ही त्यांच्यासाठी आत्मविश्‍वास उंचावणारी बाब असेल. मालिकेत गोलंदाज सरस ठरत असल्यामुळे फलंदाजांना अधिक चांगला खेळ दाखवावा लागेल. त्यांचीच कामगिरी निर्णायक ठरणार आहे. सकाळी वाँडरर्सची खेळपट्टी कशी दिसेल, यावर संघातील अंतिम अकरा खेळाडू निश्‍चित करू.
- डू प्लेसिस, दक्षिण आफ्रिका कर्णधार

loading image