हजारे करंडक कर्नाटकाने पटकाविला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 February 2018

नवी दिल्ली - मयांक अगरवालची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि त्यानंतर एम. प्रसिद्ध कृष्णा, के. गौतम यांच्या अचूक गोलंदाजीने कर्नाटकने पाच वर्षांत तिसऱ्यांदा विजय हजारे करंडक पटकावला. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत मंगळवारी त्यांनी सौराष्ट्राचा ४१ धावांनी पराभव केला. 

नवी दिल्ली - मयांक अगरवालची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि त्यानंतर एम. प्रसिद्ध कृष्णा, के. गौतम यांच्या अचूक गोलंदाजीने कर्नाटकने पाच वर्षांत तिसऱ्यांदा विजय हजारे करंडक पटकावला. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत मंगळवारी त्यांनी सौराष्ट्राचा ४१ धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाने २५३ धावा केल्या. मयांक अगरवाल (९०) आणि त्याला साथ देताना आर. समर्थ (४८), पवन देशपांडे (४९) यांनी उपयुक्त खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राचा डाव २१२ धावांत आटोपला. कर्णधार चेकेश्‍वर पुजाराने ९४ धावांची खेळी केली. कर्नाटकाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि के. गौतम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. 

आघाडीची फळी कोलमडली, तरी कर्नाटकची दखी मधली फळी, तर कधी तळातील फळी उभी राहते, हे आज  पुन्हा एकदा दिसून आले. कर्णधार करुण नायर आणि लोकेश राहुल शून्यावर परतल्यानंतरही त्यांचे आव्हान उभे राहिले. मयांक अगरवाल एकाबाजूने टिकून राहिला. त्याला दुसऱ्या बाजूने प्रथम समर्थ आणि नंतर देशपांडेने साथ दिली. शेवटी श्रेयस गोपाळनेही झटपट ३१ धावांची खेळी केली. कमलेश मकवाना, प्रेरक मंकड या फिरकी गोलंदाजांनी अनुक्रमे ४ आणि दोन गडी बाद केले. पण, अनुभवी रवींद्र जडेजाने गोलंदाजी केली नाही. हे कर्नाटकाच्या पथ्यावर पडले. सामन्यानंतर रवींद्र जडेजाने गोलंदाजी न केल्याचा फरक पडल्याचे मान्य केले. 

आव्हानाचा पाठलाग करताना सुरवातीला कृष्णासमोर सौराष्ट्राची नाव हेलकावे खात होती. त्याला चेतेश्‍वर पुजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. पण, नावेत समोरच्या  बाजूने कुणाची थांबायला तयार नव्हते. त्यामुळे त्याची खेळी एकाकी ठरली. गौतमच्या फिरकीसमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पुजारा ४० व्या षटकांत शतकाच्या उंबरठ्यावर असताना धावबाद झाला आणि त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. पुजारा बाद होणारा सौराष्ट्राचा नववा फलंदाज होता. त्यानंतर तीन षटकांतच सौराष्ट्राचा डाव आटोपला.

संक्षिप्त धावफलक - कर्नाटक ४५.५ षटकांत सर्व बाद २५३ (मयांक अगरवाल ९०, आर. समर्थ ४८, पवन देशपांडे ४९, श्रेयस गोपाळ ३१, कमलेश मकवाना ४-३४, प्रेरक मांडक २-५४) वि.वि. सौराष्ट्र ४६.३ षटकांत सर्व बाद २१२ (चेतेश्‍वर पुजारा ९४, अवी बारोट ३०, एम. प्रसिद्ध कृष्णा ३-३७, के. गौतम ३-२७)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hajare cricket karandak