फिरकी ठरणार निर्णायक?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 September 2017

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून 

चेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले जात आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून 

चेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले जात आहे.

गेल्या काही वर्षांत भारतास मायदेशात केवळ ऑस्ट्रेलियानेच कसोटीत आव्हान दिले आहे; पण त्यांना मायदेशाबाहेरील गेल्या आठ एकदिवसीय सामन्यांत यश लाभलेले नाही; मात्र स्टीवन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा चिवट ऑस्ट्रेलियन संघ चित्र बदलण्याची नक्कीच क्षमता बाळगून आहे; पण भारतास भारतात हरविणे दिवसेंदिवस अवघड आहे, याची त्यांना जाणीव आहे.

भारताने गेल्या पंधरांपैकी तीनच वन-डे गमावल्या आहेत. हे अपयशही परदेशात आहे. त्यातच कांगारूंची डोकेदुखी वाढवण्यासाठी मनगटाच्या साह्याने चेंडू फिरक करणाऱ्या युजवेंद्र चाहल आणि कुलदीप यादवला भारताने पसंती दिली आहे. त्यासाठी बोटाने चेंडूस फिरक देणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाला संघाबाहेर ठेवले आहे.

या मालिकेत भारताची भक्कम बाजू असलेल्या फलंदाजीतच काही फटी दिसत आहेत. शिखर धवनऐवजी संघात आलेला अजिंक्‍य रहाणे स्फोटक सुरवात देण्याची शक्‍यता कमी आहे. मार्गदर्शक रवी शास्त्री कितीही सांगत असले तरी महेंद्रसिंह धोनी पूर्वीसारखा फिनिशर राहिलेला नाही. केएल राहुल, मनीष पांडे आणि केदार जाधव यांचे संघातील स्थान अद्याप निश्‍चित नाही. त्यातच चांगल्या अष्टपैलू खेळाडूचा शोध संपलेला नाही. खरे तर दोन्ही संघांसाठी ही मालिका पूर्वतयारीचा भाग आहे. भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा योग्य संघ शोधत आहे, तर ऑस्ट्रेलियाला ॲशेसची पूर्वतयारी करायची आहे. 

भारतीय उपखंडात फिरकी महत्त्वाची ठरते. ही मालिकाही यास अपवाद नसेल. डावाच्या मधल्या षटकात फिरकी गोलंदाज कशी कामगिरी करतात, त्यावर खूप काही अवलंबून असेल. 
- स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलिया कर्णधार

आम्हाला संघात परिपूर्ण अष्टपैलू हवे आहेत. तो गोलंदाज किंवा फलंदाज अष्टपैलू नसावा. आम्ही त्याकडे लक्ष केंद्रित करीत आहोत. त्यांच्यामुळे संघात समतोल साधला जातो.
- विराट कोहली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india-austrolia one day cricket match