esakal | सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया जोमात
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नई - अध्यक्षीय संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात आक्रमक फटका मारताना ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर.

सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया जोमात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नई - मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास भारतात आलेल्या ऑस्टेलियाने टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी जोरदार सुरवात केली. अध्यक्षीय संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी १०३ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगलीच बहरली.

सहा महिन्यांपूर्वी भारतात कसोटी मालिकेत हार स्वीकारावी लागलेला ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या उमेदीने आता एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-२० मालिका खेळण्यास आला आहे. आजच्या सराव सामन्यातील विजयापेक्षा प्रमुख खेळाडूंनी केलेली कामगिरी त्यांना सुखावणारी ठरेल.

बीसीसीआयच्या निवड समितीने अध्यक्षीय संघात आयपीएलमध्ये चमकदार कामिगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना स्थान दिले होते. दुलीप करंडक स्पर्धा सुरू असल्याने भारताच्या दुसऱ्या फळीचे खेळाडू या संघात नव्हते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४७ धावा केल्या आणि त्यानंतर अध्यक्षीय संघाला ४८.२ षटकांत २४४ धावांत गुंडाळले.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (६४), स्टीव स्मिथ (५५), ट्रॅव्हिस हेड (६५), मार्क्‍स स्टोनिस (७६) यांनी बहारदार फलंदाजी केली. धडाकेबाज शैलीचा ग्लेन मॅक्‍सवेल मात्र संधीचा फायदा घेऊ शकला नाही. कसोटी मालिकेत वॉर्नर अपयशी ठरला होता. त्यामुळे सराव सामन्यात सापडलेला सूर त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकेल. 

आयपीएलमध्ये स्टीव स्मिथने नेतृत्व केलेल्या पुणे संघातून खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलिया फलंदाजांचा तडाखा सुरू असतानाही २३ धावांत दोन बळी अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने स्टीव स्मिथलाच बाद केले. त्यानंतर मॅक्‍सवेलला माघारी धाडले. 

आयपीएलमध्ये याच पुणे संघातून खेळणारा आणि स्मिथची वाहवा मिळवणारा पुण्याचा राहुल त्रिपाठी कशी कामगिरी करतो याकडे लक्ष होते; पण तो अवघ्या सात धावांवर बाद झाला. श्रीवत्स गोस्वामी व मयांक अगरवाल यांनी चाळिशी पार केली; परंतु दोघांनाही अर्धशतके करता आली नाहीत. अध्यक्षीय संघाची ८ बाद १५६ अशी अवस्था झाल्यावर अक्षय कर्णेवार व कुशांग पटेल यांनी प्रत्येकी ४० धावा केल्यामुळे अध्यक्षीय संघाला २०० चा टप्पा पार करता आला.

ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक जमेची बाब म्हणजे डावखुरा फिरकी गोलंदाज ॲस्टन ॲगरने मिळवलेल्या चार विकेट. टीम इंडियाचा सामना करताना ॲगर व झॅम्पा हे त्यांचे प्रमुख फिरकी गोलंदाज असणार आहेत.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया - ५० षटकांत ७ बाद ३४७ (डेव्हिड वॉर्नर ६४- ४८ चेंडू, ११ चौकार, स्टीव स्मिथ ५५- ६८ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, ट्रॅव्हिस हेड ६५- ६३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, मार्क्‍स स्टोनिस ७६- ६० चेंडू, ४ चौकार, ५ षटकार, मॅथ्यू वेड ४५- २४ चेंडू, २ चौकार, ४ षटकार; कुशांग पटेल २-५८, वॉशिंग्टन सुंदर २-२३) वि. वि. अध्यक्षीय संघ ः ४८.२ षटकांत सर्व बाद २४४ (श्रीवत्स गोस्वामी ४३- ५४ चेंडू, २ चौकार, मयांक अगरवाल ४२- ४७ चेंडू, ४ चौकार, अक्षय कर्णवाल ४०- २८ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, कुशांग पटेल- ४१; केन रिचर्डसन २-३६, ॲस्टन ॲगर ४-४४).

loading image