भारताचा बांगलादेशवर चुरशीचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 April 2018

कोल्हापूर - सामना क्रिकेटचा. तोही टी-२० प्रकारातील. प्रतिस्पर्धी भारत आणि बांगलादेश. फरक इतकाच की सामना रंगत होता तो या दोन देशातील व्हीलचेअरवरून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये. दिव्यांग असूनही त्यांच्यातील जोश आणि उत्साह तोच होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने जिंकला. अगदी अखेरच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचे खेळाडू घेत असलेला विजयाचा घास त्यांच्या तोंडातून काढून घेतला. इंटरनॅशनल व्हीलचेअर क्रिकेट कौन्सिलिंगच्या मान्यतेनुसार या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी टी-२०ला साजेशी फटकेबाजी करत २० षटकांत २०७ धावा केल्या. सलामीचे फलंदाज सौरभ मलिक व अतुल श्रीवास्तव गोलंदाजांवर तुटून पडले. सौरभने २० चेंडूंत ३५, तर अतुलने २३ चेंडूंत ३६ धावा ठोकल्या. बांगलादेशचा गोलंदाज मोहंमद रिपॉनने सौरभला त्रिफळाचित केले. बांगलादेशकडून उज्जाल बैरागीने दोन, तर सोपन दावनने एक गडी बाद केला. 

आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या षटकापासून वेगवान फलंदाजी केली. १० षटकांत त्यांनी एक गडी गमावून ९३ धावा फटकाविल्या. मोहंमद रिपॉनने ४० चेंडूंत ९१ केल्या. मोहंमद मोहीदील इस्लामने ३२ चेंडूंत ४३ धावा फटकावून सामना फिरवला. मोहंमद राजनने ६ चेंडूंत १७ धावांची आक्रमक फलंदाजी केली. सामना पुन्हा रंगात आला होता. अखेरच्या षटकात बांगलादेशला पंधरा धावांची गरज होती. बांगलादेशच्या फलंदाजाने पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार ठोकल्याने प्रेक्षकांची चिंता वाढलेली.

तिसऱ्या चेंडूवर धाव न दिल्याने प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला. चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकला आणि जिंकण्यासाठी केवळ तीन धावांची गरज उरली. अनुभवी गोलंदाज सौरभ मलिकने अटीतटीच्या क्षणी पाचव्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला केवळ एकच धाव घेता आली. भारताकडून हुकूमसिंग व अमित यादव यांनी प्रत्येकी दोन, तर सौरभ मलिक, लक्ष्मण बिरडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india bangaladesh cricket match