भारताकडून श्रीलंकेचा डावाने पराभव; मालिकेत आघाडी

नरेंद्र चोरे
Monday, 27 November 2017

भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीसच विजय निश्‍चित झाला होता. आता फक्त विजयाची औपचारिकताच बाकी राहिली होती.

नागपूर - एकाच डावात चार फलंदाजांच्या शतकी खेळीनंतर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे श्रीलंकेचा दुसरा डाव कोलमडल्याने भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 1 डाव आणि 239 धावांनी विजय मिळवीत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून आर. आश्विनने चार बळी मिळविले. याबरोबरच त्याने कसोटी कारकिर्दीत 300 बळी मिळविण्याची कामगिरी केली.

भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीसच विजय निश्‍चित झाला होता. आता फक्त विजयाची औपचारिकताच बाकी राहिली होती. आज (सोमवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के श्रीलंकेला दिले. करुणारत्नेचा अवघड झेल मुरली विजयने घेतल्यानंतर त्यापाठोपाठ थिरीमन्नेही उमेश यादवचा शिकार ठरला. जडेजाने अँजेलो मॅथ्यूजला बाद करत विजय आणखी जवळ आणून ठेवला. त्यानंतर अश्विननेही आपल्या फिरकीची कमाल दाखवत श्रीलंकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. लंचनंतर विजयाची औपचारिकता पूर्ण करत भारतीय संघाने विजय साजरा केला. 

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवशी मुरली विजय, चेतेश्‍वर पुजाराच्या शतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक आणि रोहित शर्माचे नाबाद शतक अशा दणकेबाज खेळ्या झाल्यावर भारताने पहिला डाव ६ बाद ६१० धावसंख्येवर घोषित केला होता.

पहिल्या डावात ४०५ धावांनी पिछाडीवर पडल्यावर श्रीलंका संघाची अवस्था १ बाद २१ अशी झाल्यामुळे आज सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारतीय संघ विजयाला गवसणी घालणार यात शंका नव्हती. जामठा मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ करणार ही चर्चा पूर्ण फोल ठरली आहे. भारताच्या चार फलंदाजांनी शतके ठोकत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. कोहलीचे कारकिर्दीमधील पाचवे द्विशतक साजरे झाले. रोहित शर्मानेही शतक ठोकून घेतले. अशा स्थितीत अजिंक्‍य रहाणेला आपले अपयश नक्कीच सतावत असेल. 

खेळपट्टी गोलंदाजांना काहीच साथ देत नसताना भारतीय फलंदाज अगदी सहजपणे त्या खेळपट्टीवर वावरत होते. श्रीलंकेचा एकही गोलंदाज त्यांना अडचणीत पकडू शकत नव्हता. पुजारा आणि कोहली यांनी भारताचा डाव भक्कम केला. मोठ्या भागीदारीनंतर पुजारा साथ सोडून गेल्यावर रहाणेचा ‘बॅड पॅच’ येथेही कायम राहिला. मात्र, रोहित शर्माने कर्णधाराला साथ दिली आणि भारताचा धावांचा डोंगर उभा केला. कोहलीने पुजारासोबत तिसऱ्या विकेटसाठी १८३ आणि पुढे जाऊन रोहितच्या साथीत पाचव्या विकेटसाटी १७३ धावा अशा दोन मोठ्या भागीदारी केल्या. ही जोडी खेळत असतानाच भारताचे वर्चस्व सिद्ध झाले होते. कोहली ३८७ मिनिटांच्या खेळीत १७ चौकार आणि दोन षटकार ठोकून २१३ धावांवर बाद झाला. त्यापूर्वी पुजाराने १४३ धावांचे योगदान दिले. डावाच्या अखेरीस शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहितने ती औपचारिकता पूर्ण केल्यावर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. रोहित १६० चेंडूत ८, चौकार, एका षटकारासह १०२ धावांवर नाबाद राहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india beat sri lanka in second test