esakal | भुवनेश्‍वर, बुमरा सर्वोत्तम
sakal

बोलून बातमी शोधा

भुवनेश्‍वर, बुमरा सर्वोत्तम

आम्ही खेळलेल्या गेल्या १५ सामन्यांपैकी १३ सामन्यांत पराभव पत्करला आहे. या सततच्या पराभवाने खेळाडू निराशेच्या गर्तेत अडकले असून, त्यांना प्रेरित करणे कठीण जात आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे चांगले नाही. नव्याने सुरवात करण्यासाठी आता आम्हाला एका विजयाची गरज आहे.
- स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

भुवनेश्‍वर, बुमरा सर्वोत्तम

sakal_logo
By
पीटीआय

इंदूर - एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात ‘स्लॉग ओव्हर्स’मध्ये भुवनेश्‍वरकुमार आणि जसप्रीत बुमरा यांची कामगिरी उंचावली आहे. याचा प्रत्ययदेखील गेल्या काही सामन्यांत आला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना झाल्यावर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेही त्यांची पाठ थोपटली. ‘भुवनेश्‍वर आणि बुमरा हे ‘स्लॉग ओव्हर्स’मधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याची प्रतिक्रिया तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर बोलताना व्यक्त केली. 

सलामीचा फलंदाज ॲरॉन फिंच (१२४) आणि कर्णधार स्मिथ यांच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यात एकवेळ तीनशेहून अधिक धावसंख्या उभारणार असेच वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ५० षटकांत ६ बाद २९३ धावांचीच मजल मारता आली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सहज फलंदाजी करून विजय साकार केला.

स्मिथ म्हणाला,‘‘चुकीच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळण्याची सवय आणि भारतीय गोलंदाजांनी नेमक्‍या क्षणी उंचावलेली कामगिरी यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. मुख्य म्हणजे सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये भुवनेश्‍वर आणि बुमरा हे सर्वोत्तम गोलंदाज आहेत असेच त्यांच्या कामगिरीवरून म्हणता येईल. त्यांनी आज अप्रतिम मारा केला.’’

भारताविरुद्ध खेळताना आता आम्हाला योग्य मार्ग निवडायला हवा. आम्ही सुरवात चांगली केली होती; पण नियोजन परिपूर्णपणे मैदानात उतरवू शकलो नाही, असे सांगून स्मिथ म्हणाला,‘‘विजयाजवळ यायचे आणि पराभव पत्करायचा, असा अलीकडे जणू ऑस्ट्रेलियाचा ‘ट्रेंड’च पडला आहे. आम्ही चांगली सुरवात करतो; पण त्याचा फायदा उठवू शकत नाही. आम्ही कामगिरीचे कसे प्रदर्शन करतो यावरच बरेच अवलंबून आहे.’’

loading image