परदेशात पुन्हा दाणादाण

सुनंदन लेले
Tuesday, 9 January 2018

केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट संघाची परदेशात पुन्हा एकदा दाणादाण झाली. 

केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट संघाची परदेशात पुन्हा एकदा दाणादाण झाली. 

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १३० धावांत गुंडाळल्यावर विजयासाठी २०८ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची फार काही वेगळी अवस्था झाली नाही. त्यांचा डाव व्हर्नान फिलॅंडरसमोर ४२.४ षटकांत १३५ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी ७२ धावांनी जिंकली. 
तिसरा दिवस तुरळक रिमझिम पावसाने वाया गेल्यावर चौथ्या दिवशीच्या खेळाचे महत्त्व वाढले. पहिल्या डावात विशेष छाप पाडू न शकलेल्या महंमद शमीने चौथ्या दिवशी जबरदस्त मारा करून हशिम आमला आणि नाइट वॉचमन रबाडाला लगेच बाद केले. बुमराने प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकला बाद केले. बघता बघता भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचे ८ फलंदाज ६५ धावांत तंबूत पाठवून त्यांच्या डावाला १३० धावांवर पूर्णविराम दिला.

विजयाकरता २०८ धावांचे आव्हान दिसते तेवढे सोपे नाही, हे यजमान संघाच्या घसरगुंडीवरूनच कळून आले होते. भारताच्या शिखर धवन, मुरली विजय या सलामीच्या जोडीसह चेतेश्‍वर पुजाराही झटपट बाद झाल्यावर भारताचा आजच पराभव होणार हे स्पष्ट झाले. कोहली-रोहित शर्मा यांच्या भागीदारीवर खूप काही अवलंबून होते. पण, हा विचार मनात पूर्ण होईपर्यंतच फिलॅंडरने कोहली आणि रोहितला बाद केले. रबाडाने पंड्याला स्थिरावू दिले नाही. चहापानापूर्वी रबाडाने साहाचीदेखील विकेट मिळवली. चहापानास असलेल्या ७ बाद ८२ अशा स्थितीतून अश्‍विन-भुवनेश्‍वर कुमारच्या जोडीने तग धरला. या जोडीची ४९ धावांची रंगलेली भागीदारी तोडायला फिलॅंडरला गोलंदाजीला यावे लागले. त्याने पहिल्या चेंडूंवर अश्‍विनला बाद केल्यावर त्याच षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर शमी आणि बुमराला बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात ६ बळी घेणारा फिलॅंडर सामन्याचा मानकरी ठरला.  

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका २८६ आणि १३० (एबी डिव्हिलर्स ३५, मार्करम ३४, डीन एल्गर २५, जसप्रीत बुमरा ३-३९, महंमद शमी ३-२८, हार्दिक पंड्या २-२७, भुवनेश्‍वर कुमार २-३३) भारत २०९ आणि सर्वबाद १३५ (विराट कोहली २८, शिखर धवन १६, अश्‍विन ३७, व्हर्नान फिलॅंडर ६-४२, मॉर्ने मॉर्केल २-३९, कागिसो रबाडा २-४१)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india loss by south africa