मालिका जिंकण्याची दुहेरी संधी..!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 February 2018

सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघाला उद्या टी २० मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे. 

भारतीय संघ आता याचीच पुनरावृत्ती ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्येही करण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना जिंकून ही मोहीमही फत्ते करण्याची संधी उद्याच मिळणार आहे; तर दुसरीकडे विराट सेनेचा झंझावात रोखायचा कसा, असा प्रश्‍न यजमानांसमोर पडला आहे.

सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघाला उद्या टी २० मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे. 

भारतीय संघ आता याचीच पुनरावृत्ती ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्येही करण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना जिंकून ही मोहीमही फत्ते करण्याची संधी उद्याच मिळणार आहे; तर दुसरीकडे विराट सेनेचा झंझावात रोखायचा कसा, असा प्रश्‍न यजमानांसमोर पडला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्या दोन कसोटींत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला आणि त्यानंतर आफ्रिकेची प्रतिकारशक्तीही कमजोर केली. यात अपवाद होता तो पावसाचा व्यत्यय आलेल्या एका एकदिवसीय सामन्याचा. उर्वरित सर्व सामन्यांत भारताने फलंदाजी तसेच गोलंदाजीत आपली ताकद दाखवली आहे.

फाफ डुप्लेसीस, एबी डिव्हिलर्स, क्विंटॉन डिकॉक यांच्या दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीत अगोदरच कमजोर झाला आहे. तरीही संधी मिळालेल्या इतर खेळाडूंना एक तर फिरकीचे कोडे सोडवता आलेली नाही आणि दुसरीकडे भुवनेश्‍वर कुमारच्या वेगातील बदलासमोर त्यांची त्रेधा उडाली आहे. 

एकदिवसीय मालिकेत तोंड पोळल्यानंतरही रविवारी झालेल्या पहिल्या ट्‌वेन्टी-२० सामन्यात आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा केला; परंतु रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली यांनी हूक आणि पुलच्या फटक्‍यांचे उत्तर दिले. या सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाला असला, तरी त्याने पहिल्या षटकातच केलेली तुफानी टोलेबाजी दिशा ठरवणारी होती. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सुरेश रैनानेही आल्या आल्या आक्रमक पवित्रा घेतला होता.

पहिल्या ट्‌वेन्टी-२० सामन्यात वेगात धाव पूर्ण करताना विराटच्या पायाचा स्नायू दुखावला होता. काही काळ क्षेत्ररक्षण केल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. विजयानंतर बोलताना मोठी दुखापत नसल्याचे त्याने सांगितले होते; परंतु विश्रांतीसाठी तो उद्याच्या सामन्यात न खेळण्याची शक्‍यता आहे.

महिला संघही वर्चस्व राखणार
भारतीय महिला संघालाही उद्या बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुहेरी मालिका विजेतेपदाची संधी आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिलांनी टी २० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. 
सहा सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना उद्या होणार आहे. पहिले दोन सामने सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडू शबनीम ईस्माइल हिच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले होते. स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर, पूनम यादव यांच्यावर भारतीय संघाची प्रामुख्याने मदार असेल. भारतीय महिलांनी ही मालिका जिंकल्यास दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकाचवेळी दोन मालिका जिंकण्याची अनोखी कामगिरी त्यांच्या नावावर लिहीली जाईल. महिलांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियात टी २० मालिका जिंकली आहे. मिताली, स्मृती आणि हरमनप्रीत बाद झाल्यावर भारताची मधली फळी कोलमडली आहे. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारी पार पाडावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india south africa t 20 cricket series