वेगवान माऱ्यापुढे पुन्हा नांगी

सुनंदन लेले
Thursday, 25 January 2018

विराट कोहली, चेतेश्‍वर पुजाराचे अर्धशतक; भारत सर्वबाद १८७
जोहान्सबर्ग - तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांची अर्धशतके वगळता भारतीय डावात काहीच घडले नाही. पहिल्याच दिवशी ७७ षटकांत भारताचा डाव १८७ धावांत आटोपला.

दिवसअखेर आफ्रिकेची १ बाद ६ अशी खराब सुरवात झाली. एड्रियन मार्करमला (२) भुवनेश्वरने तिसऱ्या षटकात बाद केले. डीन एल्गर (४) व नाइटवॉचमन कागिसो रबाडा (०) नाबाद होते.

विराट कोहली, चेतेश्‍वर पुजाराचे अर्धशतक; भारत सर्वबाद १८७
जोहान्सबर्ग - तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांची अर्धशतके वगळता भारतीय डावात काहीच घडले नाही. पहिल्याच दिवशी ७७ षटकांत भारताचा डाव १८७ धावांत आटोपला.

दिवसअखेर आफ्रिकेची १ बाद ६ अशी खराब सुरवात झाली. एड्रियन मार्करमला (२) भुवनेश्वरने तिसऱ्या षटकात बाद केले. डीन एल्गर (४) व नाइटवॉचमन कागिसो रबाडा (०) नाबाद होते.

तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी वेगवान गोलंदाजीला पसंती देत फिरकी गोलंदाजाला वगळण्याचा निर्णय घेतला. भारताने आश्‍विनच्या जागी भुवनेश्‍वर, तर दक्षिण आफ्रिकेने केशव महाराजला वगळून फेहलुकवायोला संधी दिली. भारताने दुसरा बदल करताना रोहित शर्माच्या जागी अजिंक्‍य रहाणेला अपेक्षित पसंती दिली. नाणेफेक जिंकून कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. सलामीच्या जोडीसह मधल्या आणि तळाच्या फळीने नांगी टाकली. कोहली (५४) आणि पुजारा (५०) या दोघांखेरीज भुवनेश्‍वर कुमार (३०) या तिघांनाच दोन आकडी मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून फिलॅंडर, मॉर्केल, फेहलुकवायो यांनी प्रत्येकी दोन तर रबाडाने तीन गडी बाद केले. 

भारताची लोकेश राहुल आणि मुरली विजय ही सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. व्हर्नान फिलॅंडरच्या स्विंगने सलामीच्या जोडीची झोप उडवली. इतकेच नाही, तर दुसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या चेतेश्‍वर पुजाराला देखील फिलॅंडरच्या स्विंगचा अंदाज येत नव्हता. पुजाराने यातून स्वतःला सावरले. पण, त्यापूर्वी राहुलला ते जमले नाही. रबाडाने मुरली विजयला बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतील अचूकता भन्नाट होती. पुजाराला खाते उघडण्यासाठी ५४ चेंडूंचा सामना करावा लागला. कोहली मात्र विश्‍वासाने खेळत होता. ही जोडी जमली खरी, पण त्यांना पंचांच्या निर्णयाची देखील साथ मिळाली. दोघेही एकेकदा पायचीत होते.

‘रिव्ह्यू’मध्ये ते स्पष्ट दिसले. मात्र, दोन्ही वेळी तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवल्यामुळे पुजारा, कोहली सुदैवी ठरले. 

कमालीच्या संथपणाने पुजारा-कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा सामना केला. या जोडीने चांगला तग धरला होता. खाते उघडल्यानंतरही पुजाराने धोका पत्करला नाही. पुजारा-कोहली जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. दुसरे सत्रदेखील ही जोडी खेळून काढणार असेच वाटत असताना चहापानापूर्वी काही काळ आधी भारताला दोन धक्के बसले. रबाडाला चौकार मारून अर्धशतक पूर्ण करणारा कोहली त्यानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला. अनेक चर्चेनंतर  संधी मिळाल्यावर रहाणेचेही पुनरागमन अपयशी ठरले. मॉर्केलने त्याला पायचीत केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा पुजारा १४५ चेंडूंत २७ धावांवर खेळत होता. 

संक्षिप्त धावफलक - भारत सर्वबाद १८७ (चेतेश्‍वर पुजारा ५० -१७९ चेंडू ८ चौकार, विराट कोहली ५४ -१०६ चेंडू, ९ चौकार, भुवनेश्‍वर कुमार ३०, रबाडा ३-३९, फिलँडर २-३६, मॉर्केल २-४७, फेहलुकवायो २-२५) दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : १ बाद ६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india south africa test cricket match