‘करू शकतो ते करून दाखविण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण’

सुनंदन लेले
Monday, 29 January 2018

‘लकी’ वाँडरर्स
जोहान्सबर्गचे वाँडरर्सचे मैदान आणि भारतीय संघाचे काही तरी वेगळे नाते आहे. या मैदानावर २००३ मध्ये भारतीय संघाने विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना गमावला. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी या मैदानावर कसोटी सामना जिंकला. २००७ मध्ये याच मैदानावर टी २० विश्‍वकरंडकावर मोहोर उमटवली. २०१४ मध्ये याच मैदानावर भारतीय संघ जिंकता जिंकता राहिला आणि २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर तिसरा सामना भारतीय संघाने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करून जिंकला. परदेशातील व्हाइटवॉशची नामुष्की टाळण्यात त्यांना यश आले. या विजयानंतर भारतीय संघात नक्कीच आनंदाचे वातावरण होते. कर्णधार विराट कोहली काहीसा विचारमग्न होता.

विजयानंतर त्याच्याशी संवाद साधताना ते जाणवत होते. तो म्हणाला,‘‘भारतीय संघ परदेशात विजय मिळवू शकतो हा विश्‍वास होता. पण, ते करून दाखवण्यापर्यंतचा प्रवास मोठा विलक्षण होता.’’

आपले म्हणणे मांडताना कोहली पुढे म्हणाला, ‘‘हार असो वा जीत टीका कौतुक होतच असते; पण कुणाला काही वाटो, पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत विजयाची आम्हाला संधी होती. गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत होते. फलंदाजांनी त्या संधी दवडल्या. आमच्या गोलंदाजांनी कसोटी सामन्यांत ६० गडी बाद केले. परदेशात कदाचित प्रथमच इतकी प्रभावित गोलंदाजी भारतीयांकडून झाली असेल. मला त्यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच करू शकतो, ते करून दाखवण्यापर्यंतचा प्रवास मोठा विलक्षण होता. तो आम्ही अनुभवला.’’

चौथ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर फलंदाजी सोडा, गोलंदाजी करणेदेखील सोपे नव्हते. खेळपट्टीने अचानक स्वभाव बदलला होता. तीन दिवस चेंडू इतका उडत होता की विचारू नका. चौथ्या दिवशी काय झाले ते समजले नाही. त्यातून आमला आणि एल्गर जबरदस्त फलंदाजी करत होते. आपल्या गोलंदाजांनी खरंच कमाल केली. त्यांच्या गोलंदाजीत कमालीचे सातत्य होते. त्यांचा टप्पा आणि दिशा कधीच भरकटली नाही. काही कळायच्या आत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. परदेशात जाऊन आम्ही चांगली कामगिरी दाखवू शकतो, याचा आत्मविश्‍वास आम्हाला या दौऱ्यातून मिळाला.’’

भारतीय संघ मालिका २-१ हरला असला, तरी परदेश दौऱ्यात भारतीय संघाचा आक्रमक खेळ बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाला. विराट कोहलीच्या संघात गुणवत्ता आहे. 

चांगले वेगवान गोलंदाज असण्याचा फायदा जाणवतो आहे. परदेश दौऱ्यात फलंदाजीत सातत्य आले तर हा संघ अजून चांगली कामगिरी करू शकतो, अशी आशा नक्कीच निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india south africa test cricket match