अव्वल स्थान राखण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

भारत-श्रीलंका संघांदरम्यान कसोटी मालिका आजपासून

गॉल - श्रीलंका दौऱ्यात दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची मालिका गुंफली होती. आता हे स्थान टिकवण्याची मोहीम त्याच श्रीलंकेतून करण्याचा योगायोग जुळून आला आहे. रवी शास्त्री या नव्या प्रशिक्षकांसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून (ता. २६) सुरू होईल.

भारत-श्रीलंका संघांदरम्यान कसोटी मालिका आजपासून

गॉल - श्रीलंका दौऱ्यात दोन वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची मालिका गुंफली होती. आता हे स्थान टिकवण्याची मोहीम त्याच श्रीलंकेतून करण्याचा योगायोग जुळून आला आहे. रवी शास्त्री या नव्या प्रशिक्षकांसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून (ता. २६) सुरू होईल.

गॉलच्या मैदानावर हा सामना होत आहे. याच मैदानावर २०१५च्या दौऱ्यात झालेला सामना भारताने गमावला होता. त्यानंतर पुढील दोन सामने जिंकून भारताची विजयी मालिका सुरू होती. त्या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीची प्रगती झाली आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १२ कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवलेला आहे. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका २०१६-१७ च्या मोसमात जिंकल्या आहेत. नुकत्याच झालेल्या झिंबाब्वेविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी झगडावे लागले होते. त्यामुळे तगड्या भारताविरुद्ध त्यांचा किती निभाव लागतो हे महत्त्वाचे ठरेल.

प्रशिक्षकपदाच्या घडामोडीनंतर आता शास्त्री-कोहली जोडी मैदानावर कसा ठसा उमटवते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रवी शास्त्री २०१५च्या दौऱ्यात टीम इंडियाचे संघ संचालक होते. आता ते मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीत आहेत.

गॉलमधील त्या पराभवानंतर २०१५-१६ आणि २०१६-१७ या मोसमांचा विचार केला, तर भारत २३ कसोटींत केवळ एकाच सामन्यात पराभूत झाला. पहिला सामना सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. ताप आल्यामुळे सलामीवर के. एल. राहुल खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण संघात चांगले पर्यायी खेळाडू असल्यामुळे भारताने तातडीने दुसऱ्या सलामीवीराची मागणी केलेली नाही. त्यामुळे शिखर धवनसह अभिनव मुकुंद सलामीला खेळेल. मुकुंद ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळूर कसोटी सामन्यात खेळला होता; परंतु त्याला १६ धावाच करता आल्या होत्या. त्यासाठी ही पुनरागमनाची आणखी एक संधी आहे. त्यानंतर चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे अशी मुख्य फलंदाजीची क्रमवारी आहे. २०१५ मध्ये झालेल्या पराभवात भारताने एक फलंदाज कमी करून पाच गोलंदाजांना खेळवले होते आणि चौथ्या डावात रंगाना हेराथच्या फिरकीसमोर भारताची फलंदाजी कोलमडली होती. त्यामुळे उद्या रोहित शर्माला संधी मिळते का, याची उत्सुकता असेल.

तिलकरत्ने श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक
कोलंबो - माजी कर्णधार हसन तिलकरत्ने याची श्रीलंका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेस उद्यापासून सुरवात होत असून, याच मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर त्याची निवड करण्यात आल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर ग्रॅहम फोर्ड यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाची जागा देखील रिकामी आहे. यापूर्वी चामिंडा वाझ याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

अश्‍विनचा ५० वा सामना
भारताचा हुकमी ऑफस्पिनर उद्या कसोटी खेळण्याचे अर्धशतक पूर्ण करत आहे. अश्‍विन आणि जडेजा या जोडीच्या जबरदस्त यशामुळे भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. उद्या रोहितला स्थान देण्यासाठी चार गोलंदाज खेळवण्याचा विचार झाला, तर कुलदीप यादवला राखीव खेळाडूंत राहावे लागेल. धरमशाला येथे ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या कसोटी आणि मालिका विजयात पहिल्या डावात कुलदीपची चायनामन गोलंदाजी निर्णायक ठरली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india-sri lanka test cricket match