भारतीय संघाचा दणकेबाज प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 July 2017

शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा 

गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा केल्या.

शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा 

गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा केल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पुजारा १४४, तर अजिंक्‍य रहाणे ३९ धावांवर खेळत होता. शिखर धवन द्विशतकापासून दूर राहिला. त्याने १९० धावा केल्या. फलंदाजीचे नंदनवन असणाऱ्या गॉलच्या खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहलीला (३) आलेले अपयश वगळता सर्व गोष्टी भारताच्या मनाप्रमाणेच घडल्या. 

तब्बल ११ कसोटी सामन्यांनंतर मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने कारकिर्दीत दुसऱ्यांदा पहिल्याच सत्रात शतक साजरे केले. पदार्पणात केलेल्या १८७ धावांच्या खेळीची त्याने आठवण करून दिली. चहापानापूर्वी त्याने आपली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या मागे टाकली. पण, त्यानंतर लगेच तो बाद झाला. त्याने पुजाराच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली.

धवनचा सलामीचा साथीदार अभिनव मुकंद (१३) बाद झाल्यावर आठव्याच षटकात खेळायला आलेल्या चेतेश्‍वर पुजाराने नंतर पूर्ण दिवस फलंदाजी केली. रहाणेच्या साथीत त्याने चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. भारताच्या आजच्या फलंदाजीने पहिल्याच दिवशी यजमान श्रीलंकेला बॅकफूटवर नेले. 

स्नायूच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नुआन प्रदीपनेच भारताचे तीन फलंदाज बाद केले. उसळणाऱ्या चेंडूवर बाद होण्याची चूक कोहलीने या कसोटीतही कायम राखली. नुआन प्रदीप वगळता श्रीलंकेचा एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखू शकला नाही. त्यातच कुशल गुणरत्ने जखमी झाल्याने आता फलंदाजीतही त्यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे. 

धावफलक - 
भारत पहिला डाव : धवन झे. मॅथ्यूज गो. प्रदीप १९० (१६८ चेंडू, ३१ चौकार), अभिनव मुकुंद झे. डिकवेला गो. प्रदीप १२, पुजारा खेळत आहे १४४ (२४७ चेंडू, १२ चौकार), कोहली झे. डिकवेला गो. प्रदीप ३, रहाणे खेळत आहे ३९, अवांतर ११, एकूण ९० षटकांत ३ बाद ३९९
गडी बाद क्रम - १-२७, २-२८०, ३-२८६
गोलंदाजी - नुआन प्रदीप १८-१-६४-३, चामरा कुमारा १६-०-९५-०, दिलरुवान परेरा २५-१-१०३-०, रंगना हेराथ २४-४-९२-०, दनुष्का गुणतिलका ७-०-४१-०

थोडक्‍यात पहिला दिवस
द्विशतक हुकलेला शिखर धवन भारताचा सातवा फलंदाज
महंमद अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड दोन वेळा द्विशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाले. लोकेश राहुल, वीरेंद्र सेहवाग, बुधी कुंदरन अन्य फलंदाज
चेतेश्‍वर पुजाराची धवनच्या साथीत २५३ धावांची भागीदारी. 
कसोटीत पुजाराची द्विशतकी भागीदारी करण्याची पाचवी वेळ. मुरली विजय, विराट कोहलीच्या साथीत दोनदा
भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी २०१६ पासून झालेली आठवी द्विशतकी भागीदारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india sri lanka test cricket match