esakal | भारत-श्रीलंका पहिली वन-डे आज
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-श्रीलंका पहिली वन-डे आज

भारत-श्रीलंका पहिली वन-डे आज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही
दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढती जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटीतील धुलाईने खच्ची झालेल्या श्रीलंका संघास चॅंपियन्स करंडक लढतीतील विजयाचा इतिहासही प्रेरणा देत नाही, हेच खरे आहे.

श्रीलंकेस विश्‍वकरंडक स्पर्धेच्या थेट प्रवेशासाठी भारताविरुद्धच्या मालिकेतील दोन लढती जिंकण्याची गरज आहे. अर्थात श्रीलंकेला वेस्ट इंडीज मागे टाकण्याची शक्‍यता नाही. त्यासाठी विंडीजला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ५-० असे धवल यश हवे आहे. अर्थात सध्या श्रीलंका संघासाठी प्रेरणादायक काहीच घडत नाही.

श्रीलंकेचा वन-डे कर्णधार उपुल थरंगा याची सरासरी ३४.३२ आहे. तो कसोटी मालिकेत सातत्याने अपयशी ठरला आहे. संघावर चहूबाजूने टीका होत असताना थरंगाचे लक्ष संघाची कामगिरी उंचावण्यापेक्षा स्वतःच्या फलंदाजीकडे जास्त असेल. लसिथ मलिंगा संघात परत येत आहे; पण तो किती सामने खेळू शकेल, याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. अँजेलो मॅथ्यूज गोलंदाजी करणार, असे सांगितले जात आहे. हे घडल्यास तो अनफिट होण्याची शक्‍यता वाढेल आणि फलंदाजी जास्तच दुबळी होईल. श्रीलंकेचे कट्टर पाठीराखेही ०-५ व्हाइटवॉशसाठी जणू स्वतःला तयार करीत आहेत.

भारतीय संघ युवराज सिंग, सुरेश रैना, अश्‍विन, रवींद्र जडेजाविना मैदानात उतरणार आहे. चौथ्या क्रमांकावर के. एल. राहुल याला पाठवण्याचा प्रयोग किती यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीकडे जरा जास्तच लक्ष असेल. त्याची विंडीजविरुद्धची ११४ चेंडूतील ५४ धावांची खेळी अजून कोणी विसरलेले नाही.

गोलंदाजीत जास्तच प्रयोग होतील. महम्मद शमी तसेच उमेश यादवच्या अनुपस्थितीत भुवनेश्‍वर आणि जसप्रीत बुमरा गोलंदाजीची सुरवात करतील. हार्दिक पंड्या आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चाहल हे कायमस्वरूपी संघात येण्यासाठी प्रयत्न करतील.

कोहली-धोनी फुटबॉल लढत
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी चर्चा होती ती विराट कोहली वि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील लढतीची. निमित्त होते ते फुटबॉल लढतीचे. भारतीय संघाच्या सरावात नेहमीच फुटबॉल खेळला जातो. आता तंदुरुस्तीस जास्त महत्त्व असल्यामुळे थेट दोन संघ करण्यात आले. त्यातील एकाचे नेतृत्व विराट, तर दुसऱ्या संघाचे धोनीकडे होते. खेळाडूंची तंदुरुस्ती जाणून घेण्यासाठी ही फुटबॉल लढत महत्त्वाची ठरते, असेही मानले जाते. भारतीय संघाची निवड करताना तंदुरुस्ती महत्त्वाची असेल, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केल्यामुळे या लढतीस महत्त्व आहे. बीसीसीआय’नेच या लढतीची माहिती ट्विट करून दिली. या लढतीची छायाचित्रेही ट्विट केली आहेत; पण या लढतीचा निकाल काय लागला, चाचणीतून काय समजले, हे मात्र जाहीर करणे सर्वांनीच टाळले आहे.

loading image