टीम इंडियाची प्रतिष्ठा पणास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 December 2017

मोहाली - मुख्य कर्णधार विराट कोहलीच्या विवाहाचे इटलीत नगारे वाजत असताना इकडे भारतात मात्र त्याच्या टीम इंडियाचा ‘ढोल’ वाजला आहे. त्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमधीलही आपली ताकद आणि अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ रोहित शर्मा आणि कंपनीवर आली आहे. एकापाठोपाठ एक मालिका विजयाची मालिका गुंफणाऱ्या या संघासमोर आता मालिका गमावण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात उद्या विजय आवश्‍यकच आहे.

धरमशालामध्ये मानहानिकारक पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. फलंदाजीतले दारुण अपयश त्या पराभवास कारणीभूत होते. शंभर धावा करताना झालेली दमछाक आणि त्यानंतर श्रीलंकेने अवघ्या २० षटकांत पार केलेले आव्हान भारतीय संघाला अस्तित्वाची जाणीव करून देणारे ठरले आहे. दोन दिवसांत सर्व मरगळ झटकून भारतीय संघ सज्ज झाला तरच तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधता येणार आहे.

धरमशालाप्रमाणे मोहालीतील हा सामनाही सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे. धरमशालेतील थंड हवामान आणि खेळपट्टीतील जिवंतपणा भारतीय फलंदाजी सळो की पळो करून देणारा ठरला. मोहालीतही तशीच परिस्थिती असल्यास पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकेल आणि पुन्हा प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली, तर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ न होऊ देण्यासाठी रोहित आणि शिखर धवन यांना आघाडीवरून लढावे लागेल.

परिस्थिती अनुकूल असल्यास श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लकमल भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो, हे दुसऱ्यांदा सिद्ध झाले. कोलकाता कसोटीत पहिल्या दिवशी हिरवीगार खेळपट्टी आणि ढगाळ वातावरणाचा त्याने असाच फायदा घेतला होता. त्यानंतर नागपूर आणि दिल्लीत फलंदाजीसाठीच्या उपयुक्त खेळपट्टीवर त्याचा ‘श्‍वास’ कोंडला होता. तसेच ज्याने पूर्ण कसोटी मालिकेत एकही चेंडू टाकला नाही, त्या अँजेलो मॅथ्यूजने धरमशालेत भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडले होते. या दोन्ही गोलंदाजांचा सामना कसा करायचा, याचे उत्तर शोधण्यासाठी भारतीयांसमोर दोनच दिवसांचा कालावधी आहे. 

सलामीवीर रोहित-धवन यांच्यानंतर दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना प्रथम मानसिकता बदलावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने कोलमडणारा डाव सावरताना केलेली फलंदाजी त्यातल्या त्यात दिलासा देणारी होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india srilanka one day cricket match