मालिकेतील निर्विवाद वर्चस्वासाठी भारतीय संघ सज्ज

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कोलंबो  - कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर एकमेव टी-२० सामन्यात विजय मिळवून संपूर्ण वर्चस्व गाजविण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार झाला असल्याने विजय अपेक्षित मानल्या जात आहे. 

कोलंबो  - कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेचा व्हाईटवॉश केल्यानंतर एकमेव टी-२० सामन्यात विजय मिळवून संपूर्ण वर्चस्व गाजविण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार झाला असल्याने विजय अपेक्षित मानल्या जात आहे. 

या विजयाचा आत्मविश्‍वास आगामी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय खेळाडूंना उपयोगी पडेल. कारण आगामी काळात भारतीय संघ एकूण नऊ टी-२० सामने  खेळणार आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघ तयार करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ सध्या प्रयोग करीत आहे. असे करीत असताना त्यांनी युवा रिशभ पंतला संधी  द्यायला पाहिजे होती, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या आठवड्यात आजारी आईला  पाहण्यासाठी शिखर धवन मायदेशी परत आला, अशा वेळी निवड समितीला पर्यायी खेळाडू  म्हणून रिशभ पंतला पाठविता आले असते. धवनच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने पाचव्या एकदिवसीय सामन्यात डावाची सुरुवात केली. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल, अशी शक्‍यता आहे. 

के. एल. राहुल अपयशी ठरला असला तरी त्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. मनीष पांडे आणि पाचव्या सामन्यात अर्धशतक काढणारा केदार जाधव मधल्या फळीतील जबाबदारी घेतील. पाचव्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला अंतिम अकरात स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. कारण तो टी-२० सामन्यात आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील टी-२० सामन्यात कोहलीने पाच गोलंदाज खेळविताना पांड्याला विश्रांती दिली होती. येथे पांड्याची निवड झाल्यास चार पूर्णवेळ गोलंदाज अशी रचना राहील. 

गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची जागा पक्की आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात महागडला ठरलेल्या वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला आणखी एक संधी मिळेल काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यास संधी मिळाली तर भुवनेश्‍वर कुमारला विश्रांती घ्यावी लागेल, अशी शक्‍यता आहे. 

झटपट क्रिकेटमध्ये दोन लेगस्पिनर खेळविणे कोहलीला आवडते. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत नागपूर आणि बंगळूर येथील सामन्यात त्याने यजुवेंद्र चाहल आणि अमित मिश्राला खेळविले होते. येथे श्रीलंकेविरुद्धही तो चाहल आणि कुलदीप यादव या दोन लेगस्पिनरला खेळविण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र, याविषयी निश्‍चित संकेत मिळू शकले नाही. कारण  भारतीय संघातील खेळाडूंनी सराव करण्याऐवजी आराम करणे पसंत केले. 

श्रीलंका संघात बदल
एकदिवसीय मालिकेतही व्हाईटवॉश झाल्यानंतर श्रीलंका व्यवस्थापनाने मूळ टी-२० संघात काही बदल केले आहे. त्यापैकी जेफ्री वंडरसे आणि अष्‌टपैलू दासून शनाका हे दोन खेळाडू प्रमुख आहेत. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीनंतर खेळू न शकलेला सुरंगा लकमलनेही पुनरागमन केले आहे. फिरकीपटू अकीला धनंजयाचाही समावेश करण्यात आला आहे. टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी वंडरसे श्रीलंका संघात होता. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे तो फारसा खेळू शकला नाही. त्याचवेळी डावखुरा लेगस्पिनर लक्षण संदाकन याला मात्र वगळण्यात आले आहे. उपूल थरंगाचा हा कर्णधार म्हणून पहिला टी-२० सामना होय. एकदिवसीय मालिकेतील अपयशानंतर त्याने पायउतार होण्यापेक्षा आगामी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या एकमेव टी-२० सामन्यात थरंगाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india srilanka T-20 cricket