कसोटी विजयाकडे भारताचा प्रवास

सुनंदन लेले
Wednesday, 6 December 2017

४१० धावांच्या आव्हानासमोर श्रीलंका ३ बाद ३१

४१० धावांच्या आव्हानासमोर श्रीलंका ३ बाद ३१
नवी दिल्ली - प्रदूषणाचा त्रास मागे ठेवून विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्ली कसोटी जिंकण्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. चंडिमलच्या दीडशतकाच्या खेळीनंतरही पहिल्या डावात श्रीलंकेला ३७३ धावांत रोखले गेले तिथेच गती मिळाली. दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करून भारताने ५ बाद २४६ धावा उभारत श्रीलंकेला ४१० धावांचे लक्ष्य दिले. मग १६ षटकांत लंकेने सलामीवीर समरविक्रमा-करुणारत्ने आणि नाइटवॉचमन लकमलची विकेट गमावत ३१ धावा जमा करताना तग धरला. पाचव्या दिवशी पाहुणा संघ सामना वाचवायच्या आणि भारतीय संघ विजय मिळवायच्या जिद्दीने मैदानात उतरतील.

ईशांतने चंडिमलला बाद करून लंकेचा पहिला डाव संपवला. घसघशीत आघाडी हाती लागली; पण भारतीय गोलंदाज थकले होते. दुसऱ्या डावात विजय लवकर बाद झाला. चांगली खेळी करायला झगडणाऱ्या रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली. तो दोन वेळा बाद होताना वाचला. मग आततायी फटका मारायच्या नादात विकेट आणि वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी गमावली.

पुजाराने चांगला खेळ पुढे चालू ठेवला. झटपट ४९ धावा करून तो बाद झाला. कोहलीने मग रोहितसह हल्ला चालू ठेवला. मोठे फटके मारताना दोनही फलंदाज अडखळत नव्हते. पसरवून ठेवलेल्या क्षेत्ररचनेमुळे मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पळून काढणेही शक्‍य होत होते. विराट-रोहितने झपाट्याने धावा जमा केल्या. अर्धशतक करून विराट बाद झाला आणि रोहित अर्धशतक करून नाबाद राहिला.

पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत श्रीलंकन फलंदाजांनी दुसऱ्या डावात सावध पण भक्कम फलंदाजी केली. ईशांत आणि शमीच्या वेगवान माऱ्याला तोंड देऊन विकेट शाबूत ठेवली. विराटने कोटलावर हजर असलेल्या प्रेक्षकांना गोलंदाजांना प्रोत्साहन द्यायला उद्युक्त केले. लागोपाठ दोन सणसणीत बाऊन्सर टाकून ६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने समरविक्रमाला बाद केले. 

करुणारत्ने आणि धनंजयाने अजून पडझड होऊ न देण्याकरिता बराच प्रयत्न केला. जडेजाने करुणारत्नेला बाद करून अजून एक पाऊल विजयाकडे टाकले. श्रीलंकेने नाईट वॉचमन म्हणून सुरंगा लकमलला फलंदाजीला पाठवले, ज्याला जडेजाने बोल्ड केले. कोटलाच्या विकेटने अजून अपेक्षित जादू दाखवणे चालू केले नसल्याने भारतीय गोलंदाजांना कसोटी विजय हाती घ्यायला अनुभव पणाला लावावा लागणार आहे.

धावफलक
भारत - पहिला डाव - ७ बाद ५३६ घोषित
श्रीलंका - पहिला डाव - (९ बाद ३५६ वरून) दिनेश चंडीमल झे. धवन गो. ईशांत १६४-३६१ मिनिटे, २१ चौकार, १ षटकार, लक्षण संदकन नाबाद ०, अवांतर १६, एकूण १३५.३ षटकांत सर्वबाद ३७३

गोलंदाजी - महंमद शमी २६-६-८२-२, ईशांत शर्मा २९.३-७-९८-३, रवींद्र जडेजा ४५-१३-८६-२, आर. अश्विन ३५-८-९०-३

भारत - दुसरा डाव - मुरली विजय झे. डिकवेला गो. लकमल ९, शिखर धवन यष्टिचीत डिकवेला गो. संदकन ६७-९१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, अजिंक्‍य रहाणे झे. संदकन गो. परेरा १०, चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. डिसिल्वा ४९-६६ चेंडू, ५ चौकार, विराट कोहली झे. लकमल गो. गमगे ५०-५८ चेंडू, ३ चौकार, रोहित शर्मा खेळत आहे ५०-४९ चेंडू, ५ चौकार, रवींद्र जडेजा खेळत आहे ४, अवांतर ७, एकूण ५२.२ षटकांत ५ बाद २४६ घोषित

बाद क्रम - १-१०, २-२९, ३-१०६, ४-१४४, ५-२३४
गोलंदाजी - सुरंगा लकमल १४-३-६०-१, लाहिरू गमगे १२.२-१-४८-१, दिलरुवान परेरा ११-०-५४-१, धनंजय डीसिल्वा ५-०-३१-१, संदकन १०-०-५०-१.

श्रीलंका - दुसरा डाव - दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. जडेजा १३, सादिरा समरविक्रमा झे. रहाणे गो. शमी ५, धनंजय डिसिल्वा खेळत आहे १३, लकमल त्रि. गो. जडेजा ०, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे ०, एकूण १६ षटकांत ३ बाद ३१

बाद क्रम - १-१४, २-३१, ३-३१
गोलंदाजी - ईशांत शर्मा ३-०-६-०, महंमद शमी ३-०-८-१, आर. अश्विन ५-२-१२-०, रवींद्र जडेजा ५-२-५-२.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india srilanka test cricket competition