टीम इंडिया दाखवणार दस का दम?

पीटीआय
Thursday, 28 September 2017

बंगळूर - वर्चस्व मिळवून मालिका खिशात टाकणाऱ्या भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियालाही व्हॉइटवॉश देण्याची तयारी सुरू केली आहे. सलग दहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी भारताला आहे. 

बंगळूर - वर्चस्व मिळवून मालिका खिशात टाकणाऱ्या भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियालाही व्हॉइटवॉश देण्याची तयारी सुरू केली आहे. सलग दहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी भारताला आहे. 

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उद्या होणारा हा सामना आकडेवारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलियासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. गेल्या जुलै महिन्यात अँटिगामध्ये भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव झाला होता. त्यानंतर सलग नऊ विजयांची मालिका गुंफलेली आहे. दुसरीकडे जानेवारीत ॲडलेड येथील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला एकही विजय मिळवता आलेला नाही. सलग ११ सामने त्यांनी गमावलेले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत हॅट्‌ट्रिक करून भारताने एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मालिकेतील उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकला तरी, भारताला आपले हे अव्वल स्थान प्रदीर्घ काळ कायम राखता येणार आहे, तर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले, तर त्यांची पाचव्या स्थानी घसरण होईल.

चार वर्षांनी सामना
चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीत काही वर्षांमध्ये बदल होऊन ती संथ झाली आहे. चार वर्षांनंतर येथे एकदिवसीय सामना होत आहे. चार वर्षांपूर्वीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५७ धावांनी पराभव केला होता. आत्ताच्या खेळपट्टीबाबत अंदाज व्यक्त करणे सोपे नसले तरी, एप्रिल-मे महिन्यांतील आयपीएलमधील बहुतांशी सामने कमी धावसंख्येचे झाले होते.

गोलंदाजीत बदल होणार?
भारतीय संघ व्यवस्थापन साधारणतः विजयी संघात बदल करत नाही; परंतु पुढील काळात अजून काही एकदिवसीय सामने खेळायचे असल्यामुळे आता राखीव असलेल्या उमेश यादव किंवा महंमद शमी यापैकी एकाला संधी मिळू शकते. फलंदाजीत मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्याकडून अपेक्षा पूर्ण होत नसल्या, तरी त्यांना आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियासमोर अडचणी
पराभवाचा सामना करावा लागत असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अडचणी वाढत आहेत. ॲडम झॅम्पाला वगळून ॲस्टन ॲगर या फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली होती; परंतु इंदूरमधील सामन्यात  त्याच्या बोटाला फ्रॅक्‍चर झाले. आता पुन्हा झॅम्पाला संधी दिल्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे पर्याय नसेल; तसेच वेगवान गोलंदाज पॅट कमिंस ॲशेससाठी तंदुरुस्त राहावा, यासाठी भारताविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली. आता एकदिवसीय मालिका गमावलेली असल्यामुळे उर्वरित सामन्यांतूनही त्याला विश्रांती दिली जाऊ शकते आणि पुन्हा जेम्स फॉकनरला संधी मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india vs australia cricket