लॉर्डसवर स्वप्नभंग

पीटीआय
रविवार, 23 जुलै 2017

लंडन - मिताली राजच्या भारतीय महिला संघास इतिहास घडवण्यात आज अपयश आले. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये क्रिकेट पंढरी ‘लॉर्डस’वर जिंकलेल्या जगज्जेतेपदाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या मिताली राज आणि तिच्या सहकाऱ्यांना इंग्लंडला घरच्या मैदानावर पाणी पाजण्याचे स्वप्न सत्यात उतरवता आले नाही. भारतीय महिलांनी सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट दिसत असलेला विजय अक्षरशः हिरावून घेतला.

लंडन - मिताली राजच्या भारतीय महिला संघास इतिहास घडवण्यात आज अपयश आले. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये क्रिकेट पंढरी ‘लॉर्डस’वर जिंकलेल्या जगज्जेतेपदाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या मिताली राज आणि तिच्या सहकाऱ्यांना इंग्लंडला घरच्या मैदानावर पाणी पाजण्याचे स्वप्न सत्यात उतरवता आले नाही. भारतीय महिलांनी सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट दिसत असलेला विजय अक्षरशः हिरावून घेतला.

मोक्‍याच्या वेळी कामगिरी उंचावलेल्या झूलन गोस्वामीने रचलेल्या पायावर मुंबईकर पूनम राऊतची कामगिरी भारतास विजयपथावर नेणार असेच वाटत होते; पण त्यांच्या सहकाऱ्यांनी मोक्‍याच्या क्षणी नांगी टाकली. पायात गोळे आल्यावरही चिवटपणे लढणारी पूनम संघाच्या १९१ धावा असताना बाद झाली. त्या वेळी विजयासाठी सात षटकात ३७ धावांची गरज होती; पण पूनमसह भारताच्या अखेरच्या सात फलंदाज २८ धावांत बाद झाल्या आणि भारतीय महिलांचा लॉर्डसवर स्वप्नभंग झाला.

इंग्लंडने खराब सुरवातीनंतर संयमाने खेळ केला. प्रथम फलंदाजी करताना अखेरच्या दहा षटकांत त्यांनी विकेट्‌स राखून तर ठेवल्याच पण, धावांची गतीदेखील चांगली राखली. त्यामुळेच त्यांना ५० षटकांत ७ बाद २२८ धावांची मजल शक्‍य झाली. त्यानंतर भारताची सुरवातही खराब झाली. डावाच्या मध्यातही त्यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. भारतीय महिलांनी क्षेत्ररक्षणात दाखवलेला हलगर्जीपणा इंग्लंडच्या महिलांनी दाखवला नाही. हेच भारताच्या पराभवाचे पहिले कारण ठरले. कर्णधार मिताली राज आणि शिखा पांडे यांना धावबाद करताना त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवलेली चपळता उल्लेखनीय होती. अखेरच्या पॉवर प्लेमध्ये पूनम राऊत आणि वेदा कृष्णमूर्ती झुंजत होत्या. पॉवर प्ले संपल्यावर मात्र त्यांना पुन्हा एकदा विकेट्‌स असूनही धावांचा वेग राखता आला नाही. हे भारताच्या पराभवाचे दुसरे कारण ठरले. भारताच्या डावाची खराब सुरवात करणाऱ्या श्रुबसोले हिनेच एकामागून एक दणके देण्यास सुरवात केली. तिची गोलंदाजी भारतीयांची डोकेदुखी ठरू लागली. तिने विकेटचा षटकार खेचत भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला आणि भारतास नऊ धावांनी हार पत्करण्यास भाग पाडले. भारताच्या डावाला तिनेच २१९ धावांवर पूर्णविराम दिला.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड - 7 बाद 228 (लॉरेन विनफिल्ड 24 , टॅमी ब्यूमॉंट 23, सारा टेलर 45 - 62 चेंडू, नतालिया स्किव्हर 51 - 68 चेंडूत 5 चौकार, कॅथरीन ब्रंट 34 , जेनी गन नाबाद 25, लॉरा मार्श नाबाद 14, झूलन गोस्वामी 10-3-23-3, राजेश्‍वरी गायकवाड 10-0-49-1, पूनम यादव 10-0-36-2). 

भारत - 48.4 षटकांत 219 (पूनम राऊत 86- 115 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार, हरमनप्रीत कौर 51- 80 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार, वेदा कृष्णमूर्ती 35- 34 चेंडूंत 5 चौकार, दीप्ती शर्मा 14, ऍन्या श्रुबसोल 9.4-0-46-6, ऍलेक्‍स हार्टली 10-0-58-2). 

Web Title: sports news India vs England Women’s World Cup