पाकिस्तान चॅंपियन

पीटीआय
सोमवार, 19 जून 2017

लंडन - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजीतील बेशिस्तपणाचा फटका भारताला बसला. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा उठवत रविवारी पाकिस्तानने चॅंपियन्स करंडकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी भारतावर एकतर्फी वर्चस्व राखत १८० धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली. 

लंडन - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजीतील बेशिस्तपणाचा फटका भारताला बसला. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा उठवत रविवारी पाकिस्तानने चॅंपियन्स करंडकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी भारतावर एकतर्फी वर्चस्व राखत १८० धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली. 

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर पाकिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३३८ धावा केल्या. फखर झमानचे शतक आणि अझर अली, महंमह हफीज यांची अर्धशतकी खेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत संपुष्टात आला. रथी महारथी फलंदाज अपयशी ठरल्यावर हार्दिक पंड्याच्या ४३ चेंडूंतील ७६ धावांच्या खेळीचे समाधान भारताला लाभले. पाकिस्तानकडून महंमद अमीर आणि हसन अली यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. 

विजयासाठी ३३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकापासून धक्के बसायला सुरवात झाली. पहिल्याच षटकांत रोहित शर्मा बाद झाला. तिसऱ्या षटकांत कर्णधार विराट कोहली बाद झाला. विशेष म्हणजे आधीच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता. या दोन धक्‍क्‍यातून नंतर भारतीय संघ कधीच सावरू शकला नाही. अन्य फलंदाज खेळपट्टीवर उपस्थिती लावण्याचे काम करून परतले. अपवाद फक्त हार्दिक पंड्याचा ठरला. त्याने ४३ चेंडूंत ४ चौकार, ६ षटकारांसह वेगवान ७६ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. धाव काढण्याची घाई त्याला महागात पडली. तो धावबाद झाला. या एकमेव खेळीचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले. 

प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर भुवनेश्‍वर आणि बुमरा यांनी सुरवातीला पाकिस्तानच्या फखर आणि अझर या सलामीच्या जोडीवर दडपण ठेवले. बुमराने फखरला बाददेखील केले; पण तो नो-बॉल ठरला. यानंतर मात्र, फखर आणि अझर यांनी भारतीय गोलंदाजांबरोबर त्यांच्या क्षेत्ररक्षकांची कसोटी पाहिली. चोरट्या धावा घेत त्यांनी क्षेत्ररक्षकांना आव्हान दिले; पण या नादात क्षेत्ररक्षकांची दमछाक झाली. नेहमी शिस्त पाळणाऱ्या गोलंदाजांनीदेखील दडपण घेतले. वाईड बॉलची खैरात करत त्यांनी ते अधिक वाढवले. सलामीच्या जोडीने लागोपाठ अर्धशतक पूर्ण केल्यावर अशीच चोरटी धाव घेण्याच्या नादात अझर धावबाद झाला. तोवर २३ षटके आणि १२८ धावा खर्ची झाल्या. फखरने वेळप्रसंगी धाडसी फटके खेळून शतकी मजल गाठली. आपल्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार खेचणाऱ्या फखरने ४१ चेंडू धाव न घेता खेळून काढले, तरी त्याचे शतक ९१ चेंडूंत झाले. फखर बाद झाल्यावर बाबर आझम आणि शेवटी महंमद हफीज भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरले. गोलंदाजांचा बेशिस्तपणा वाढतच गेला आणि पाकिस्तानने २०० वरून तीनशे धावांचा टप्पा १३ षटकांत ओलांडला. हफीजने अखेरच्या षटकांत सहज फटकेबाजी करून ३४ चेंडूंत अर्धशतक गाठले. भारताकडून भुवनेश्‍वरवगळता एकही गोलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. 

संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान ५० षटकांत ४ बाद ३३८ (फखर झमान ११४ -१०६ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, अझर अली ५९- ७१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, महंमद हफीज नाबाद ५७ -३७ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, बाबर आझम ४६, इमाद वसिम नाबाद २५, शोएब मलिक १२, भुवनेश्‍वर १-४४, हार्दिक पंड्या १-५३, केदार जाधव-१-२७) वि.वि. भारत ३०.३ षटकांत सर्वबाद १५८ (हार्दिक पंड्या ७६ -४३ चेंडू, ४ चौकार, ६ षटकार, युवराजसिंग २२, शिखर धवन २१, महंमद अमीर ३-१६, हसन अली ३-१९, शादाब खान २-६०, जुनैद खान १-२०).

भारताविरुद्धचा साखळी सामना हरल्यावर स्पर्धा अजून संपली नाही इतकेच खेळाडूंना समजावले होते. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना चांगला खेळलो आणि आज विजेते ठरलो. फलंदाजांच्या कामगिरीवर गोलंदाजांनी प्रत्येकवेळेस कळस चढविला. 
- सर्फराज खान,  पाकिस्तान कर्णधार

संघातील गुणवत्तेचे पाकिस्तानने चोख प्रदर्शन केले. पाकिस्तानचा दिवस असतो, तेव्हा ते कोणत्याही अव्वल संघाला पराभूत करू शकतात, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. आम्ही स्पर्धेत चांगला खेळ केला, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आहे. पण, अंतिम सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीने खेळलो नाही. पाकिस्तानचे अभिनंदन. 
- विराट कोहली, भारताचा कर्णधार

दृष्टिक्षेपात चॅंपियन्स
 चॅंपियन्स स्पर्धेत शतक झळकाविणारा फखर झमान पाकिस्तानचा तिसरा फलंदाज. यापूर्वी सईद अन्वर आणि शोएब मलिक
 २००३ नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानची डावात शतकी सलामी. आशियाई बाहेरही दुसरी
 आयसीसी स्पर्धेत (अझर-फखर १२८) पाकिस्तानची भारताविरुद्ध सर्वोत्तम भागीदारी
 चॅंपियन्स स्पर्धेत आतापर्यंत केवळ २०१३ मध्येच प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता. पाच वेळा पाठलाग करणारा संघ विजयी
 प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या
 आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील पाकिस्तानचा मोठ्या फरकाने विजय. यापूर्वीचा विजय ऑस्ट्रेलियाचा २००३ मध्ये भारताविरुद्धच.

Web Title: sports news india vs pakistan champions trophy 2017 cricket