भारतीय महिलांकडून पाकचा धुव्वा

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

डर्बी - इंग्लंड तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध बहारदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात सूरच गवसला नाही; पण याचा पाकिस्तानचा आनंद क्षणभंगुर ठरला. भारतीयांनी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अधिक प्रभावी मारा करताना पाक फलंदाजांना प्रतिकाराची संधीही दिली नाही. भारताने हा सामना ९५ धावांनी जिंकला. 

डर्बी - इंग्लंड तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध बहारदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात सूरच गवसला नाही; पण याचा पाकिस्तानचा आनंद क्षणभंगुर ठरला. भारतीयांनी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अधिक प्रभावी मारा करताना पाक फलंदाजांना प्रतिकाराची संधीही दिली नाही. भारताने हा सामना ९५ धावांनी जिंकला. 

नाश्रा संधू तसेच तिच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे भारतास पावणेदोनशेचाही पल्ला गाठता आला नाही; पण एकता बिश्‍तने नाश्राच्या कामगिरीचा विसर पडेल याची खबरदारी घेताना नव्या चेंडूवर जास्त अचूक आणि भेदक मारा करीत पाकला त्यांची शंभरीही भरवता येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. पाकचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत संपुष्टात आला. पाकची सलामीची फलंदाज नाहिदा खान हिच्या २३ धावांमुळेच पाकला भारताविरुद्धचा नीचांक टाळता आला. ती बाद होणारी सातवी फलंदाज ठरली, पण तोपर्यंत ४४ धावाच झाल्या होत्या. कर्णधार साना मीरने त्यानंतर प्रतिकार केला; पण तिला भारताचा विजय केवळ लांबवता आला. 

डायना बेगने तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पहिल्या दोन सामन्यात जवळपास दोनशे धावा केलेल्या स्मृती मंधानास चकवले. यानंतरही पूनम राऊत आणि दिप्ती शर्माने दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली, पण १ बाद ७४ या २२.१ षटकातील सुरवातीनंतर भारतास ५० षटकात ९ बाद १६९ एवढीच मजल मारता आली. 

स्मृतीला बाद केलेल्या डायनाच्या स्विंग माऱ्याने भारतास सतावले. त्यानंतर नाश्रा संधूच्या डावखुऱ्या फिरकीचा पुरेसा अंदाजच भारतीयांना आला नाही. तिला सादिया युसुफची मोलाची साथ लाभली. त्यांनी भारतीयांच्या धावगतीसही वेसण घातली. 

अखेरची पंधरा षटके ही धावगतीस वेग देण्यासाठी योग्य समजली जातात, पण भारतीयांना ३५ ते ४५ या दहा षटकात २१ धावा करताना दोन फलंदाज गमवावे लागले होते, एवढेच नव्हे तर अखेरच्या दहा षटकांत ५५ धावा होऊ शकल्या त्या सुषमा वर्माने ३५ चेंडूंत ३३ धावा केल्यामुळे. मात्र डावातील अखेरच्या षटकातील टिच्चून फलंदाजीच अखेर निर्णायक ठरली. 

संक्षिप्त धावफलक 
भारत ः ९ बाद १६९ (पूनम राऊत ४७ - ७२ चेंडूत ५ चौकार, स्मृती मंधाना २, दिप्ती शर्मा २८ - ६३ चेंडूत २ चौकार, मिथाली राज ८, सुषमा वर्मा ३३ - ३५ चेंडूत ३ चौकार व १ षटकार, अवांतर १०, नाश्रा संधू १०-१-२६-४, सादिया युसुफ १०-२-३०-२) वि. वि. पाकिस्तान ः ३८.१ षटकांत  सर्वबाद ७४ (नाहिदा खान २३ - ६७ चेंडूंत ३ चौकार, साना मीर २९, एकता बिश्‍त ५-१८, मानसी जोशी २-९).

Web Title: sports news india vs pakistan women