तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय

पीटीआय
Monday, 28 August 2017

पल्लिकल  - जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या श्रीलंकेला नंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे तिसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकताना पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारताने ९ बाद २१७ असे रोखले. लाहिरू थिरीमन्ने याने अर्धशतकी खेळी केली; पण बुमरासमोर त्यांचे अन्य फलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने पाच गडी बाद केले. भारताने ४ बाद २१८ धावा केल्या. रोहित शर्माचे शतक आणि धोनीची मोलाची अर्धशतकी साथ यामुळे भारताचा विजय साकार झाला.

विजयासाठी २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आजही भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारताचा डाव ४ बाद ६१ असा अडचणीत आला असताना रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या एकत्र आलेल्या जोडीने पाचव्या विकेटसाठी १५७ नाबाद धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा१२४; तर धोनी ६७ धावा काढून नाबाद राहिले.

त्यापूर्वी, पहिल्या दोन सामन्यांचा अनुभव लक्षात घेऊनही श्रीलंकेचा बदली कर्णधार चामरा कापुगेदरा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिनेश चंडिमल आणि लाहिरू थिरीमन्ने या दोघा अनुभवी फलंदाजांचा समावेश करूनही त्याचा फायदा श्रीलंकेला झाला नाही. अर्थात, या दोघांनीच संघाचा डाव तारण्याचा प्रयत्न केला. पण, अन्य फलंदाजांना अपयश आल्याने त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. 

बुमराने निरोशान डिकवेला आणि कुशल मेंडीस यांना झटपट बाद केल्यावर चंडिमल आणि थिरीमन्ने यांनीच श्रीलंकेचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. त्या वेळी पंड्याने चंडिमलला बाद केले. ही जोडी फुटल्यावर अभावानेच श्रीलंकेचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाही. या वेळी बुमराची गोलंदाजी खेळणे त्यांच्या फलंदाजांना जमले नाही. बुमराने ठराविक अंतराने श्रीलंकेला धक्के देत त्यांचा डाव अडचणीत आणला. थिरीमन्नेची ८० धावांची खेळीच श्रीलंकेसाठी समाधान देणारी ठरली. 

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका ५० षटकांत ९ बाद २१७ (थिरीमन्ने ८०, चंडिमल ३६, सिरीवर्धने २९, बुमरा ५-२७)  पराभूत वि. भारत ४५.१ षटकांत ४ बाद २१८ (रोहित शर्मा नाबाद १२४ -१४५ चेंडू, १६ चौकार, २ षटकार, धोनी नाबाद ६७ -८६ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, अकिला धनंजय २-३८)

‘त्या’ भारत-श्रीलंका सामन्याची आठवण
श्रीलंकेच्या अपयशी कामगिरीने त्यांचे चाहते प्रचंड नाराज आहेत. पहिला सामना हरल्यावर चाहत्यांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला होता. दुसरा सामना जिंकता जिंकता ते हरले होते. आजही जिंकण्याची चाहूल त्यांना लागली होती. मात्र, सामना हरल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून सामना रोखून धरला. सर्व खेळाडू मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतले. जवळपास अर्ध्या तासाच्या या नाट्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. या वेळी भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान १९९६ मध्ये विश्‍वकरंडक स्पर्धेत कोलकता येथे याच दोन संघात झालेल्या सामन्याची आठवण झाली. श्रीलंकेच्या ८ बाद २५१ धावांचा पाठलाग करताना भारताची ३४.१ षटकांत ८ बाद १२० स्थिती झाली होती. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने अतिरेक केला. श्रीलंका कर्णधार अर्जुन रणतुंगाने सर्व संघ पॅव्हेलियनमध्ये नेला. खेळ पुन्हा सुरु करण्याची चर्चा झाली पण रणतुंगाने खेळण्यास नकार दिल्याने सामनाधिकारी लॉईड यांनी श्रीलंकेला सामना बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news India vs Sri Lanka