esakal | चौथ्या दिवशी लंका चितपट
sakal

बोलून बातमी शोधा

चौथ्या दिवशी लंका चितपट

चौथ्या दिवशी लंका चितपट

sakal_logo
By
पीटीआय

गॉल, ता. २९ - मागील श्रीलंका दौऱ्यातील गॉल कसोटीतले अपयश धुवून काढण्याचे ‘मिशन’ विराट कोहलीने तडीस नेले. चौथ्या दिवशी त्याच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही प्रतिकाराची संधी दिली नाही. ३०४ धावांनी दणदणीत विजय नोंदवीत भारताने तीन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

३ बाद १८९ वरून भारताने ५१ धावांची भर घातली. ७६ धावांवर नाबाद राहिलेल्या विराटने शतक पूर्ण केले. त्याने दिवसातील सहाव्याच षटकात हा टप्पा पार केला. १३३ चेंडूंमध्येच त्याने ही मजल मारली. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने डाव घोषित केला.

लंकेसमोर ५५० धावांचे अशक्‍यप्राय आव्हान होते. त्यांचा डाव २४५ धावांतच संपुष्टात आला. पहिल्या डावाच्या तुलनेत त्यांच्या ४६ धावा कमीच झाल्या.

सलामीचा फलंदाज करुणारत्ने याचा प्रतिकार एकाकी ठरला. आणखी दुर्दैव म्हणजे त्याचे शतक तीन धावांनी हुकले. अश्‍विनचा चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नात त्याचा त्रिफळा उडाला. तो बाद झालेला सहावा फलंदाज ठरला.

गॉलच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना साथ मिळते, पण या वेळी असे अपवादाने घडले. त्यानंतरही जडेजा आणि अश्‍विन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. करुणारत्ने आणि मेंडीसने धोका पत्करला नाही, पण शक्‍य तेवढ्या धावा काढण्यावर त्यांचा भर होता. जडेजाने मेंडिस आणि पाठोपाठ लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला बाद केले. मॅथ्यूज स्वस्तात परतला. करुणारत्ने व प्रदीप यांना अश्‍विनने एकाच षटकात टिपले.

१०३ धावांचा योगायोग
भारताच्या २०१५ मधील दौऱ्यात गॉलमध्येच पहिली कसोटी झाली होती. त्या वेळी बहुतांश सत्रांत वर्चस्व राखूनही भारतालाच ६३ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तेव्हा विराटने पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मात्र तो केवळ तीन धावा करू शकला होता. नंतर मात्र दोन्ही कसोटी जिंकून भारताने मालिकेत बाजी मारली होती. कर्णधार म्हणून त्या कसोटीतून खूप धडे मिळाले, असे विराटने नमूद केले होते.

दोन वर्षांपूर्वीच्या मालिकेत याच मैदानात आम्ही पहिली कसोटी गमावली होती. या वेळी जास्त सफाईदार कामगिरी झाल्याचे निकालातूनही स्पष्ट होत आहे. या कसोटीतील कामगिरीवर खूश आहे. खेळपट्टीने फारशी साथ न देताही यशस्वी झाल्यामुळे हा विजय खास आहे. कौशल्यपूर्ण खेळ केला. प्रतिस्पर्ध्यांवर दडपण ठेवले, तर विजय मिळतोच हे दिसले. सलामीच्या जोडीसाठी होत असलेली स्पर्धा नक्कीच सुखावणारी आहे.
- विराट कोहली

ही खेळपट्टी चांगली होती. नाणेफेकीचा कौलही फारसा निर्णायक ठरला. भारताने विजयी संघास साजेसाच खेळ केला. आम्हाला खेळाच्या सर्वच क्षेत्रांत प्रगती करावी लागणार आहे. 
- रंगना हेराथ

 भारताचा परदेशातील सर्वांत मोठा कसोटी विजय. यापूर्वी २७९ धावांनी इंग्लंडविरुद्ध लीडस्‌ला (१९८६).

भारताचा धावांच्या फरकाने चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय. सर्वांत मोठा विजय आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी दिल्लीत (२०१५).
कोहलीच्या नेतृत्वाखाली परदेशात पाचवा कसोटी विजय.
कोहलीचे सतरावे शतक. त्यात कर्णधार म्हणून दहावे.
कोहलीची कसोटीतील सरासरी आता ५०.०३. आता तीनही प्रकारात पन्नासपेक्षा जास्त सरासरी.
भारताने प्रतिस्पर्ध्यांना दिलेले दुसऱ्या क्रमांकाचे लक्ष्य धावसंख्या. सर्वाधिक ६१७ (वि. न्यूझीलंड-वेलिंग्टन, २००८-०९) ही कसोटी अनिर्णित
या कसोटीत भारताच्या पहिल्या चारपैकी तीन फलंदाजांचे शतक. यापूर्वी हे २००९ मध्ये घडले होते. त्या वेळी श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटीत ही कामगिरी गंभीर, सेहवाग आणि द्रविडची
भारत यापूर्वीच्या गॉलमधील कसोटीत हरला होता. त्यानंतर २४ कसोटीत १८ विजय, एक पराभव आणि पाच अनिर्णित
६०० पेक्षा जास्त धावा केल्यावर भारताचे १४ कसोटीत विजय, तर १४ अनिर्णित
नेतृत्वाच्या पहिल्या २७ कसोटीत विराट कोहलीचे तीनच पराभव; मात्र सुनील गावसकर (२) आघाडीवर
या २७ कसोटीत विराटचे १७ विजय. जागतिक क्रमवारीत स्टीव वॉ (२०) आघाडीवर
२०१४ च्या बॉक्‍सिंग डे कसोटीपासून भारताचे २८ कसोटीत १८ विजय. हे सर्वाधिक. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया (१५ - ३०), इंग्लंड (१३ - ३३)
विराटचे कर्णधार असताना दहावे शतक, ४४ डावांत. भारतीय क्रमवारीत सुनील गावसकर (११) आघाडीवर
दिमुथ करुणारत्ने सहाव्या कसोटी शतकापासून दूर

धावफलक
भारत - पहिला डाव - ६००.
श्रीलंका - पहिला डाव - २९१.

भारत - दुसरा डाव - धवन झे. गुणतिलका गो. परेरा १४, मुकुंद पायचीत गो. गुणतिलका ८१, पुजारा झे. मेंडिस गो. कुमारा १५, विराट नाबाद १०३-१३६ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, रहाणे नाबाद २३, अवांतर ४, एकूण ५३ षटकांत ३ बाद २४०.

बाद क्रम - १-१९, २-५६, ३-१८९.

गोलंदाजी - नुवान प्रदीप १२-२-६३-०, दिलरुवान परेरा १५-०-६७-१, लाहिरू कुमारा १२-१-५९-१, रंगना हेराथ ९-०-३४-०, दनुष्का गुणतिलका ५-०-१६-१.

श्रीलंका - दुसरा डाव - दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. अश्‍विन ९७-२०८ चेंडू, ९ चौकार, उपुल थरांगा त्रि. गो. शमी १०, दनुष्का गुणतिलका झे. पुजारा गो. यादव २, कुशल मेंडिस झे. साहा गो. जडेजा ३६, अँजेलो मॅथ्यूज झे. पंड्या गो. जडेजा २, निरोशन डीकवेला झे. साहा गो. अश्‍विन ६७-९४ चेंडू, १० चौकार, दिलरुवान परेरा नाबाद २१, नुवान प्रदीप झे. विराट गो. अश्‍विन ०, लाहिरू कुमारा झे. शमी गो. जडेजा ०, अवांतर १०, एकूण ७६.५ षटकांत सर्व बाद २४५.

बाद क्रम - १-२२, २-२९, ३-१०८, ४-११६, ५-२१७, ६-२४०, ७-२४०, ८-२४५.
गोलंदाजी - महंमद  शमी ९-०-४३-१, उमेश यादव ९-०-४२-१, रवींद्र जडेजा २४.५-४-७१-३, आर. अश्‍विन २७-४-६५-३, हार्दिक पंड्या ७-०-२१-०.
सामनावीर - शिखर धवन
दुसरी कसोटी - ३ ऑगस्टपासून सिंहलीज स्पोर्टस क्‍लब, कोलंबो

loading image