रोहितचा पुन्हा झंझावात आणि भारताचा मालिका विजय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 December 2017

इंदूर - काही दिवसांपूर्वी मोहालीत घोंघावलेले रोहित शर्माचे वादळ आज इंदूरमध्येही धडकले. त्याच्या तुफानी टोलेबाज शतकामुळे 260 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने दुसरा सामना 88 धावांनी जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतला अंतिम सामना रविवारी मुंबईत होणार आहे.

इंदूर - काही दिवसांपूर्वी मोहालीत घोंघावलेले रोहित शर्माचे वादळ आज इंदूरमध्येही धडकले. त्याच्या तुफानी टोलेबाज शतकामुळे 260 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने दुसरा सामना 88 धावांनी जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतला अंतिम सामना रविवारी मुंबईत होणार आहे.

रोहित शर्माने आज पुन्हा एकदा कमाल केली. ट्‌वेन्टी-20 मध्ये सर्वात वेगवान 35 चेंडूतील शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हा विक्रम अगोदर दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने केला होता.

भारताने आजच्या या सामन्यात 260 धावांची भली मोठी धावसंख्या उभारली. श्रीलंकेने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचे धैर्य दाखवले. पहिल्या सामन्याप्रमाणे त्यांनी आज शस्त्र टाकली नव्हती. दहा धावांच्या सरासरीने त्यांनी 1 बाद 145 अशी मजल मारली होती. सामना अटीतटीचा होणार अशी चिन्हे दिसत असताना कुलदीप यादव आणि यजुवेंदर चाहल यांनी एकेका षटकात प्रत्येकी तीन-तीन विकेट मिळवल्या आणि तेथेच श्रीलंकेचा खेळ खल्लास झाला.

नाणेफेक गमावल्यामुळे पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताची सुरवात सावध होती; परंतु त्यानंतर रोहित शर्माने लगेचच टॉप गिअर टाकला आणि चौकार व षटकारांची आतषबाजी सुरू केली.

श्रीलंकेचे गोलंदाज हतबल झाले होते; तर क्षेत्ररक्षकांकडे सीमारेषेवर जाणारे चेंडू आणण्याचे काम होते. रोहितने 23 चेंडूत अर्धशतक केले, त्यानंतरची अर्धशतकी मजल अवघ्या 12 चेंडूत मारली. त्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की ट्‌वेन्टी-20 मध्ये पहिला द्विशतकवीर होण्याची शक्‍यता वाटू लागली होती; परंतु त्याचा झंझावात अखेर 118 धावांवर थांबला.

रोहित बाद झाल्यावर राहुलने आपली बॅट परजली आणि तोही श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याचे शतक मात्र 11 धावांनी हुकले; परंतु त्याअगोदर त्यानेही श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.

संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकांत 5 बाद 260 (रोहित शर्मा 118- 43 चेंडू, 12 चौकार, 10 षटकार, केएल राहुल 89- 49 चेंडू, 5 चौकार, 8 षटकार, महेंद्रसिंग धोनी 28- 21 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, हार्दिक पंड्या 10 - 3 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, नुवान प्रदीप 2- 61, तिसारा परेरा 2- 49) वि. वि. श्रीलंका ः 17.2 षटकांत 172 (डिक्वेला 25- 19 चेंडू 2 चौकार 1 षटकार, उपुल थरांगा 47- 29 चेंडू 3 चौकार, 2 षटकार, कुशल परेरा 77- 37 चेंडू 4 चौकार, 7 षटकार, कुलदीप यादव 3-53 यजुवेंदर चाहल 4-52)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win 20-20 series