esakal | भारत पुन्हा विजयी मार्गावर; मालिकेत बरोबरी
sakal

बोलून बातमी शोधा

भारत पुन्हा विजयी मार्गावर; मालिकेत बरोबरी

भारत पुन्हा विजयी मार्गावर; मालिकेत बरोबरी

sakal_logo
By
सचिन निकम

पुणे - मालिकेतील पहिलाच एकदिवसीय सामना गमाविल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सहज विजय मिळवत आपली गाडी पुन्हा विजयाच्या मार्गावर आणली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून, पुढील कानपूरमधील (29 ऑक्टोबर) लढत निर्णायक ठरणार आहे. 

खेळपट्टीवरून सामन्यापूर्वीच रंगलेल्या वादानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे न्यूझीलंडला भारतासमोर विजयासाठी अवघे 231 धावांचे आव्हान ठेवता आले होते. भारताने हे आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळविला. भारताकडून शिखर धवन (68 धावा) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 64 धावा) यांनी अर्धशतके झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस पोषक खेळपट्टी असल्याने विल्यम्सनने घेतलेला हा निर्णय त्यांच्या फलंदाजांना सार्थकी ठरविता आला नाही. सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि मार्टीन गुप्टील यांनी सुरवातीला आक्रमक फटके मारत भारताच्या यशस्वी जलदगती गोलंदाजांचा सामना केला. पण, भुवनेश्वरने सुरवातीला यश मिळवून देण्याची परंपरा कायम ठेवत गुप्टीलला बाद केले. त्यानंतर कर्णधार विल्यम्सनही कमाल दाखवू शकला नाही. त्याला बुमराहने पायचीत बाद केले. न्यूझीलंड या विकेटबरोबर आपली रिव्ह्यूही गमावला. मुन्रो भुवनेश्वरचा शिकार ठरला. मुंबईतील सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवून देणारी लॅथम आणि टेलरची जोडी याठिकाणी अपयशी ठरली.

टेलरला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडून पांड्याने मोठा अडसर दूर केला. लॅथम आणि निकोल्स यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लॅथम 38 धावांवर त्रिफळाबाद झाला. निकोल्स, ग्रँडहोम या जोडीने न्यूझीलंडची धावसंख्या दीडशेच्या पार नेल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये चहलने लागोपाठ डीग्रँडहोम (41 धावा) आणि अॅडम मिल्न (शून्य) यांना बाद केले. साऊदीने चहलला हॅट्ट्रीक मिळू दिली नाही. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी संघाला 200 धावांचा टप्पा करून दिला. अखेर न्यूझीलंडचा संघ 230 धावांपर्यंत मजल मारू शकला.

या आव्हानापुढे भारतीय सलामीवीरांनी 22 धावांची सलामी दिल्यानंतर रोहित अवघ्या 7 धावांवर साऊदीचा शिकार ठरला. धवनने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत कर्णधार विराटच्या साथीने 57 धावांचा भागीदारी नोंदविली. विराटचे प्रेक्षकांनी मैदानात जोरदार स्वागत केल्यानंतर त्यानेही आपल्या लौकीकास साजेसे फटके मारले. मात्र, तो 29 धावांवर डीग्रँडहोमच्या गोलंदाजीवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या दिनेश कार्तिकने धवनला चांगली साथ भारताला विजयाच्या जवळ नेले. धवनने 63 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तो शतकाकडे वाटचाल करत असताना 68 धावांवर टेलरकडे झेल देऊन बाद झाला. कार्तिकने बढती मिळालेल्या हार्दिक पांड्याला साथीला घेत संघाचे द्विशतक पूर्ण केले. पांड्याने काही आक्रमक फटकेही मारले. पण, तो भारत विजयाजवळ असताना 30 धावांवर बाद झाला. अखेर कार्तिकने धोनीच्या साथीने भारताचा विजय साकार केला.

क्युरेटर साळगावकरांचे निलंबन
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर पीच फिक्सिंग प्रकरणाचे आरोप झाल्याने त्यांचे बीसीसीआयकडून निलंबन करण्यात आले आहे. एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे यांनी याबद्दल माहिती दिली. तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. एका वृत्तवाहिनीने केलेल्या खुलाशात साळगावकर खेळपट्टीपर्यंत घेऊन गेल्याचे दिसत आहे आणि पाहिजे तशी खेळपट्टी बनवतो, असे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणावरून आज सकाळपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर त्यांचे निलंबन करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पुण्यातील खेळपट्टीवरून यापूर्वीही वाद झालेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात आयसीसीनेच या खेळपट्टीला खराब खेळपट्टीचा शेरा दिला होता. त्यामुळे खेळपट्टीवरून सामन्यापेक्षा हा वादच चर्चेचा विषय बनला.

संक्षिप्त धावफलक -
न्यूझीलंड 50 षटकांत 9 बाद 230 (हेन्री निकोल्स 42, भुवनेश्वर कुमार 3-45, यजुवेंद्र चहल 2-36) पराभूत वि. भारत 46 षटकांत 4 बाद 232 (शिखर धवन 68, दिनेश कार्तिक नाबाद 64)

loading image