भारताची विंडीजवर सहज मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

स्मृती मानधनाचे शानदार शतक
टाऊंटन - फिरकी गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि स्मृती मानधना हिच्या दिमाखदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने गुरुवारी महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आजच्या सामन्यात त्यांनी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक विजेत्या वेस्ट इंडीजचा सात गडी राखून पराभव केला. 

स्मृती मानधनाचे शानदार शतक
टाऊंटन - फिरकी गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि स्मृती मानधना हिच्या दिमाखदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने गुरुवारी महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आजच्या सामन्यात त्यांनी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक विजेत्या वेस्ट इंडीजचा सात गडी राखून पराभव केला. 

विंडीजला प्रथम फलंदाजी दिल्यावर भारताने त्यांना १८३ धावांत रोखले. त्यानंतर विजयाचे हे माफक आव्हान ४२.३ षटकांत पार केले. पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का देऊन स्पर्धेची दिमाखात सुरवात करणाऱ्या भारताकडून पुन्हा एकदा सलामीवीर स्मृती मंधानाने फलंदाजीत चमक दाखवली. पहिल्या सामन्यात ती ९४ धावांवर बाद झाली होती, आज तिने नाबाद १०६ धावांची खेळी केली.

विंडीजच्या आव्हानासमोर भारताची सुरवात खराब होती. पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा अवघ्या ३३ धावांत परतल्या होत्या. त्यानंतर मानधना आणि कर्णधार मिताली राज यांनी १०८ धावांची भागीदारी करून विजय साकार केला.

त्यापूर्वी, भारतीय महिलांच्या फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव ८ बाद १८३ असा मर्यादित राहिला. तळाची फलंदाज ॲफी फ्लेचर हिचे झेल पकडले असते, तर विंडीजला दीडशे धावाही कठीण गेल्या असत्या. दीड वर्षापूर्वी भारतातील ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत विंडीजने भारताने आव्हान संपुष्टात आणले होते. मात्र, आजच्या सामन्यात विंडीजला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांची ७ बाद १२१ अशी अवस्था केली होती. त्यांचा डाव अडखळत असताना नवव्या क्रमांकाची फलंदाज फ्लेचरने हिने मिळालेल्या दोन जीवदानाचा फायदा घेत अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत २३ चेंडूंत नाबाद ३६ धावांची खेळी केली.

भारताकडून दीप्ती शर्मा, पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. विंडीजची सलामीवीर हॅली मॅथ्यूज एका बाजूने ४३ धावांची खेळी उभारत असताना भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने विंडीजच्या डावाला खिंडार पाडण्यास सुरवात केली. बघता बघता त्यांचे सहा फलंदाज ९१ धावांत तंबूत पाठवले होते. 

संक्षिप्त धावफलक - 
वेस्ट इंडीज - ५० षटकांत ८ बाद १८३ (हॅली मॅथ्यूज ४३, शेन डॅली ३३- ३७ चेंडू ५ चौकार, ॲफी फ्लेचर नाबाद ३६- २३ चेंडू, ४ चौकार; दीप्ती शर्मा २-२७, पूनम यादव २-१९, हरमनप्रीत कौर २-३२) पराभूत वि. भारत - ४२.३ षटकांत ३ बाद १८६ (स्मृती मानधना नाबाद १०६ -१०८ चेंडू, १३ चौकार, २ षटकार, मिताली राज ४६ -८८ चेंडू, ३ चौकार)

Web Title: sports news india women cricket team win