एमसीए दरबारी अजूनही अजय शिर्केच अध्यक्ष

मुकुंद पोतदार
Thursday, 14 September 2017

पुणे - लोढा समितीच्या शिफारशींनंतर अजय शिर्के यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतरही संघटनेने ते अध्यक्ष असतानाची लेटरहेड महत्त्वाच्या कारणांसाठी वापरली आहेत. व्यवस्थापकीय समितीची बैठकीची सूचना, आधीच्या बैठकीचा इतिवृत्तांत अशांची नोंद जुन्या लेटरहेडवरच झाली आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने यातील काही लेटरहेड मिळविली. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीचा अजेंडा पाठविण्यात आला. या लेटरहेडवर अध्यक्ष म्हणून अजय शिर्के, उपाध्यक्ष म्हणून धनपाल 
शहा-कमलेश ठक्कर, मानद चिटणीस म्हणून सुधाकर शानभाग आणि मानद खजिनदार म्हणून विकास काकतकर यांची नावे आहेत. शिर्के, शहा, ठक्कर व शानभाग यांना लोढा समितीच्या शिफारशींमुळे पद सोडावे लागले. त्यानंतर नव्या नियुक्‍त्या झाल्या. काकतकर यांनी राजीनामा दिला आहे. अजेंड्यातील एका मसुद्यात काकतकर यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा करणे आणि तो मान्य झाल्यास नवी नियुक्ती करणे असा एक मुद्दा आहे.

या सूचनेवर मानद चिटणीस रियाझ बागवान यांची स्वाक्षरी आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ही चूक घडली आहे.

विद्यमान अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मी गेले सुमारे दोन आठवडे कौटुंबिक सहलीनिमित्त भारताबाहेर होतो. त्यामुळे मला याविषयी कोणतीही कल्पना नाही. मी माहिती घेईन.

दरम्यान, एक वरिष्ठ सदस्य एमसीएमधील काही घडामोडींसंदर्भात प्रशासकीय समितीकडे वेळोवेळी तक्रार करीत आहेत. त्यांच्या तक्रारीची काय दखल घेतली जाते याकडे महाराष्ट्र क्रिकेटच्या हितचिंतकांचे लक्ष 
आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news MCA chairman ajay shirke