मेलबर्नची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 January 2018

मेलबर्न - ‘ॲशेस’ मालिकेतील चौथा कसोटी सामना झालेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची असल्याचा शेरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मारल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘ॲशेस’ जिंकण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने ‘ॲशेस’ करंडक परत मिळविला होता. चौथा कसोटी सामना मात्र अनिर्णित अवस्थेत राहिला. या सामन्यात पाच दिवसांत केवळ २४ गडी बाद झाले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३२७ धावा केल्या. दुसरा डाव ४ बाद २६३ धावसंख्येवर घोषित केला होता. इंग्लंडने आपल्या एकाच डावात ४९१ धावा केल्या. 

या सामन्यानंतर ‘आयसीसी’चे सामना निरीक्षक रंजन मदुगले यांनी आपल्या अहवालात खेळपट्टी आणि मैदानाचा दर्जा निकृष्ट असल्याचा शेरा मारला आहे. ‘आयसीसी’ने या अहवालाची प्रत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिली असून, त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी आहे. 

आयसीसीच्या खेळपट्टी आणि मैदान निरीक्षण प्रक्रियेअंतर्गत मेलबर्नची खेळपट्टी निकृष्ट असल्याचा शेरा आयसीसीने मारल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. या प्रक्रियेअंतर्गत असा निकृष्ट दर्जाचा शेरा मिळाला, तर त्या मैदानाला आयसीसीकडून मिळणारे मानांकन गुण कमी होतात. आयसीसी निरीक्षक मदुगले यांनी असा अहवाल दिल्यामुळे आता मेलबर्नच्या खात्यात एक दोषांक जमा झाला आहे. मदुगले यांच्या अहवालानुसार चौकशीअंतर्गतदेखील मेलबर्न मैदानाची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची सिद्ध झाल्यास त्यांना तीन दोषांक मिळतील.

अहवालातील शेरे
 खेळपट्टीवर मध्यम स्वरूपाचा बाउन्स
 खेळपट्टीचा वेगदेखील कमी
 पाच दिवसांत एकदाही खेळपट्टीचे स्वरूप बदलले नाही
 खेळपट्टीकडून फलंदाज तसेच गोलंदाजांनाही फारशी मदत मिळाली नाही.

दोषांकांचे परिणाम
खेळपट्टीच्या दर्जावरून एखाद्या मैदानास पाच दोषांक मिळाले, तर त्या मैदानावर एका वर्षासाठी कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात नाही. एखाद्या स्टेडियमचे दोषांक १० झाल्यास दोन वर्षांसाठी संबंधित स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होत नाही. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेद
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड म्हणाले, ‘‘असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. मैदानाच्या व्यवस्थापनाशी याबाबत जरूर चर्चा केली जाईल. आमच्यासाठी ही निराशाजनक घटना आहे. सुधारणा करण्यासाठी आम्ही ‘आयसीसी’चे मार्गदर्शन घेऊ. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना गुरुवारपासून (ता. ४) सिडनी येथे खेळविला जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news melborn ground