दडपण पेलण्यात कमी पडलो - मिताली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

लंडन - विश्‍वकरंडक विजेतेपदापासून दूर राहिल्यानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज संघाच्या कामगिरीवर समाधानी होती. अखेरच्या क्षणी वाढलेल्या दडपणाचा सामना करण्यात आम्ही कमी पडलो असलो, तरी आम्ही अभिमान वाटावी अशी कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया मितालीने सामन्यानंतर बोलताना व्यक्त केली.

लंडन - विश्‍वकरंडक विजेतेपदापासून दूर राहिल्यानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज संघाच्या कामगिरीवर समाधानी होती. अखेरच्या क्षणी वाढलेल्या दडपणाचा सामना करण्यात आम्ही कमी पडलो असलो, तरी आम्ही अभिमान वाटावी अशी कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया मितालीने सामन्यानंतर बोलताना व्यक्त केली.

हातातोंडाशी आलेला विजय भारतीय महिलांपासून क्षणार्धात दूर गेला. तरी, त्यांनी केलेला प्रतिकार दाखवलेली जिद्द विसरता येणार नाही. मिताली म्हणाली, ‘‘नक्कीच! मला माझ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. इंग्लंडला विजय सोपा गेला नाही. पण, नैराश्‍येतही त्यांनी दाखवलेला संयम अफलातून होता. आम्ही येथेच कमी पडलो. एक वेळ सामना समान अवस्थेत होता. पण, त्याच क्षणी आमचा समतोल ढासळला आणि आम्ही पराभव ओढवून घेतला. तरी मला माझ्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. आम्ही खेळलेल्या प्रत्येक सामन्यात प्रतिसर्ध्याला झुंजवले. संघातील खेळाडू या तरुणी होत्या. अनुभवाने कमी होत्या. पण, त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली.’’

संघाच्या वाटचालीत झूलनचाही मोठा वाटा होता, असे सांगून मिताली म्हणाली, ‘‘झूलन अनुभवी खेळाडू आहे. संघाला तिच्याकडून जेव्हा मदतीची अपेक्षा असते, तेव्हा प्रत्येक वेळी तिने अपेक्षापूर्ती केली आहे. झूलनची अंतिम सामन्यातील गोलंदाजी नक्कीच ‘मॅच विनिंग’ होती. पण, इंग्लंड संघाची खोलवर असलेली ताकद आणि अनुभव महत्त्वाचा ठरला.’’

अचूक नियोजन
इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट हिने गेले वर्षभर केलेले नियोजन कामी आले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, ‘‘आम्ही अखेरपर्यंत टिकून राहिलो आणि आवश्‍यक धावगती पाच किंवा सहाच्या वर गेली, तर आम्ही जिंकू शकतो याचा आम्हाला विश्‍वास होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यात कसा खेळ करायचा याचे नियोजन आम्ही गेली १८ महिने करत होते. ते या स्पर्धेत कामी आले. त्यामुळेच आम्ही स्पर्धेत असे रंगलेले प्रत्येक सामने जिंकले. परिस्थितीनुसार कसे खेळायचे याच अभ्यासावर आमचा भर होता.’’
पहिल्या सामन्यात आम्ही भारताकडूनच हरलो होतो. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखले नाही, असे सांगून नाईट हिने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. ती म्हणाली, ‘‘भारतीय महिलांनी सुरेख फलंदाजी केली. त्यांनी स्पर्धेतील प्रत्येक सामना गाजवला. अंतिम सामन्यातही त्यांनी आव्हान उभे केले होते.’’

आणखी एक वर्ष खेळेन; पण पुढील विश्‍वकरंडक स्पर्धेत दिसणार नाही हे तितकेच खरे.
- मिताली राज, भारताची कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news mitali raj talking