esakal | लवकर जाण्याचा फायदा होईल - मिताली
sakal

बोलून बातमी शोधा

लवकर जाण्याचा फायदा होईल - मिताली

लवकर जाण्याचा फायदा होईल - मिताली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - विराट कोहलीची सेना दक्षिण आफ्रिकेत जम बसवण्यासाठी चाचपडत असताना मिताली राजचा संघही आता दक्षिण आफ्रिकेत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास जात आहे; परंतु महिला संघ प्रत्यक्ष सामन्यांना सुरवात होण्याअगोदर बरेच दिवस अगोदर आफ्रिकेत जात आहे. या संधीचा आम्हाला तेथील परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्यासाठी फायदा होईल, असे मत मितालीने व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी ना भारतात वेळ मिळाला, ना तेथे जाऊन पुरेसा सराव करता आला, अशी टीका अगोदर विराट कोहली आणि नंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली; परंतु महिलांचा संघ गेल्या काही दिवसांपासून बीकेसी येथील शरद पवार अकादमीत सराव करत आहे. उद्या (ता. २४) हा संघ आफ्रिकेस रवाना होत असून, पहिला सामना ५ फेब्रुवारीला खेळणार आहे. 

बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या दौऱ्याविषयी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत बरेच अगोदर जात असल्याचा फायदा होईल का, या प्रश्‍नावर मितालीने सांगितले, इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही आम्ही असेच अगोदर गेलो  होतो. तेथे आम्ही काही सराव सामने खेळलो होतो.

बाउन्स आणि स्विंगचाही आम्हाला सराव करता आला. आफ्रिकेतही असाच फायदा होईल; कारण येथे आम्हाला दोन नव्या चेंडूंनी खेळावे लागणार आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळ्या चेंडूंनी खेळण्याची ही आमची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यासाठी सराव महत्त्वाचा ठरेल.

कोणत्याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेतील आव्हान सोपे नसेल. याची आम्हाला जाणीव आहे. प्रत्येक खेळाडूला मी नव्याने सुरवात करण्यास सांगितले आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत आम्ही दक्षिण आफ्रिका संघाची क्षमता पाहिली आहे. अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी जवळपास प्रवेश केलाच होता. त्यामुळे या दौऱ्यात आम्हाला सावध राहावे 
लागणार आहे, असे मितालीने सांगितले.

सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर
विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठून महिला क्रिकेटला वेगळीच उंची गाठून देणारा मिताली राजचा संघ सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय आणि पाच ट्‌वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आम्ही पात्रता, चौरंगी स्पर्धा खेळलो होतो. त्यामुळे चांगला सराव झाला होता. तो मोसम फार बिझी होता. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर कोणतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसल्यामुळे आम्हाला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळाला. आम्ही देशांतर्गत स्पर्धा खेळलो आहोत. त्यामुळे प्रत्येक जण मॅच झोनमध्ये आहे.
- मिताली राज, भारतीय कर्णधार

loading image