esakal | महाराष्ट्राचा धुव्वा उडवित मुंबईची दुसऱ्या स्थानी झेप
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचा धुव्वा उडवित मुंबईची दुसऱ्या स्थानी झेप

महाराष्ट्राचा धुव्वा उडवित मुंबईची दुसऱ्या स्थानी झेप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजकोट - मुंबईने मुश्‍ताक अली पश्‍चिम विभागीय ट्‌वेंटी- २० स्पर्धेच्या बाद फेरीच्या आशा अचानक उंचावताना महाराष्ट्राला सात विकेट, तसेच ६४ चेंडू राखून हरवले. या विजयामुळे मुंबईने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

या लढतीपूर्वी महाराष्ट्र तिसरा होता. त्यांना स्थान उंचावण्यासाठी मुंबईविरुद्ध विजय हवा होता. प्रत्यक्षात या पराभवामुळे तो चौथ्या क्रमांकावर गेला आहे. महाराष्ट्राची सुरवात ५ षटकानंतर एक बाद ४३ अशी होती; पण त्या वेळी राहुल त्रिपाठी आणि विजय झोल ही जमलेली जोडी आकाश पारकरने फोडली. त्यानंतर महाराष्ट्राचा डाव घसरला. त्यांचे नऊ फलंदाज ४६ धावांत परतले.

महाराष्ट्राने मुंबईची सुरवात दोन बाद १७ अशी केली होती; पण आदित्य तरेने प्रतिहल्ला केला. त्याने सिद्धेश लाडसह ५९ धावांची भागीदारी ३१ चेंडूतच केली. सूर्यकुमार यादव आणि तरेने ८ चेंडूत २० धावा तडखावत ९.२ षटकांतच मुंबईला विजयी केले. मुंबई आठ गुणांसह आता दुसरे आहेत, तसेच त्यांची निव्वळ धावगती +०.८०३ आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरील सौराष्ट्र, तसेच गुजरातला हरवून मुंबईला मागे टाकू शकेल. त्याचवेळी गुजरातने सौराष्ट्रला हरवले, तर महाराष्ट्र बडोद्यास हरवून आशा निर्माण करू शकेल. 

संक्षिप्त धावफलक - महाराष्ट्र - १५ षटकांत सर्व बाद ८९ (राहुल त्रिपाठी २१ - १६ चेंडूत ३ चौकार, विजय झोल २१- १६ चेंडूत ३ चौकार, दिव्यांग हिंगणकर १५, जगदीश झोपे १०, परिक्षित वळसंगकर २-२२, आकाश पारकर ३-२२, शिवम दुबे २-७) पराभूत वि. मुंबई ः ९.३ षटकांत ३ बाद ९२ (आदित्य तरे नाबाद ४२ - २६ चेंडूत ४ चौकार व २ षटकार, सिद्धेश लाड २५, सूर्यकुमार यादव नाबाद १२).

loading image