esakal | नायरचे शतक; कर्नाटकला आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

नायरचे शतक; कर्नाटकला आघाडी

नायरचे शतक; कर्नाटकला आघाडी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर - प्रतिकूल परिस्थितीत संघाला गरज असताना करुण नायरच्या नाबाद शतकी खेळीने रणजी करंडक उपांत्य सामन्यात कर्नाटकला विदर्भाविरुद्ध पहिल्या डावांत १०९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेता आली. नायरने यष्टिरक्षक सी. एम. गौतमसोबत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर कर्नाटकने दुसऱ्या दिवस अखेरीस  ८ बाद २९४ धावा केल्या. 

कोलकता येथील ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या पाचदिवसीय सामन्यात ३ बाद ३६ अशा स्थितीत सापडलेल्या कर्नाटकसमोर दिवसभर फलंदाजी करण्याचे आव्हान होते. या निर्णायक क्षणी नायर संकटमोचक बनून आला. सुदैवाने नायरला गौतम आणि कर्णधार विनयकुमारची उत्तम साथ लाभली. नायरने दोन खेळाडूंसह केलेल्या भागीदारीमुळेच माजी रणजीविजेत्या कर्नाटकला विदर्भावर आघाडी घेण्यात यश आले. 

नायर-गौतम जोडीने उमेश यादवसह विदर्भाच्या सर्वच गोलंदाजांचा संयमीपणे सामना करीत चौथ्या गड्यासाठी १३९ धावा जोडल्या. सहा तासांपेक्षा अधिक वेळ चिवट फलंदाजी करणाऱ्या २६ वर्षीय नायरने २० चौकार व एका षटकारासह २६१ चेंडूंत नाबाद १४८ धावा फटकावल्या; तर गौतमने आठ चौकारांच्या मदतीने १२५ चेंडूंत ७३ धावा फटकावल्या. ही जोडी फुटल्यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनी कर्नाटकच्या मधल्या फळीतील स्टुअर्ट बिन्नी (४), श्रेयस गोपाल (७) व के. गौतम (१) यांना झटपट माघारी पाठवून सामन्यात रंगत आणली. मात्र, त्यानंतर दिवस अखेरीस कर्णधार विनयकुमारने नायरला मोलाची साथ केली. या जोडीने दिवस अखेरपर्यंत नवव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची भागीदारी करून कर्नाटकाची आघाडी वाढवली. आता ही भागीदारी किती लांबते यावर सामन्याचे निर्णायक चित्र अवलंबून राहील. 

संक्षिप्त धावफलक ः विदर्भ पहिला डाव : १८५. कर्नाटक पहिला डाव ९३ षटकांत ८ बाद २९४ (करुण नायर खेळत आहे १४८, सी. एम. गौतम ७३,  विनयकुमार खेळत आहे २०, उमेश यादव २-७१, रजनीश गुरबानी ५-९०).

loading image