राहुलला महाराष्ट्राची हूल; मदनेच्या धडाक्‍याने उत्तर प्रदेश पराभूत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 January 2018

सामन्यामध्ये दडपण घ्यायचे नाही हे ठरवले होते. जिंकण्याच्याच भावनेने खेळलो, यात ऋतुराज, विकास, शिंगाडे या बचावपटूंनी चोख भूमिका बजावली. 
- रिशांक देवाडिगा, महाराष्ट्राचा कर्णधार

मुंबई - राष्ट्रीय कबड्डी संघात महाराष्ट्राचे खेळाडू नसले, तरी महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डीतील अजूनही एक प्रबळ ताकद आहोत, हे राज्याच्या पुरुष संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत धडक मारत दाखवून दिले. प्रो कबड्डी तसेच भारतीय संघाचा स्टार असलेल्या राहुल चौधरीला मोक्‍याच्या वेळी मैदानाबाहेर ठेवण्याची चाल यशस्वीपणे अमलात आणत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा प्रतिकार ४४-३६ असा मोडून काढला. 

हैदराबादमध्ये गचिबाऊली येथील जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत खरे तर सामन्याच्या सुरवातीस प्रो कबड्डी स्टार राहुल महाराष्ट्रावर सहज लोण देत लढत एकतर्फी करणार असेच वाटत होते.

याचवेळी ऋतुराज कोरवीने राहुलची पकड करीत महाराष्ट्राच्या आव्हानात जान ओतली. राहुल बाद झाल्याने खच्ची झालेल्या उत्तर प्रदेशला हादरे देत महाराष्ट्राने पूर्वार्धातील एकमेव लोणही दिला. त्याचबरोबर महाराष्ट्राने विश्रांतीस २२-१५ आघाडी घेत उत्तर प्रदेशला आपण काय करू शकतो हा इशाराच दिला होता. 

उत्तरार्धात उत्तर प्रदेशने महत्त्वाच्या पकडी सुरू केल्या. महाराष्ट्राची लयच हरपली. उत्तर प्रदेशने लोण देत महाराष्ट्रावर आघाडी घेतली; मात्र, याच लोणच्या वेळी अखेरच्या बाद झालेल्या नितीन मदने याने एकाच चढाईत चार गडी बाद करीत महाराष्ट्राच्या प्रतिआक्रमणास संजीवनीच दिली.

महाराष्ट्र संघाने हा आनंद राहुलला मैदानाबाहेर ढकलत साजरा केला. सुपर टेन नितीनचे प्रयत्न वाया  जाऊ नयेत यासाठी राहुलला मैदानाबाहेर ठेवण्याची गरज होती. सुमारे पाच मिनिटे असताना सचिन शिंगाडेने राहुलला मैदानाबाहेर ढकलले. त्यानंतर महाराष्ट्राने खेळाचा वेग कमी केला. राहुल बाद होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे दोघे मैदानाबाहेर होते. महाराष्ट्राने सावध खेळ करताना गुण गमावले नाहीत, त्यामुळे राहुल मैदानात येऊ शकला नाही आणि महाराष्ट्राने उपांत्य फेरीत धडक मारली. महाराष्ट्राची उपांत्य लढत कर्नाटकविरुद्ध होईल. 

अन्य निकाल - कर्नाटक वि.वि. उत्तराखंड ५१-३१, हरियाणा वि. वि. राजस्थान ३१-२९, सेनादल वि.वि. रेल्वे ५१-४०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news national kabaddi competition