esakal | अश्‍विनसाठी वेगवान गोलंदाजांनी ‘पिच’ तयार करावे - सचिन
sakal

बोलून बातमी शोधा

अश्‍विनसाठी वेगवान गोलंदाजांनी ‘पिच’ तयार करावे - सचिन

अश्‍विनसाठी वेगवान गोलंदाजांनी ‘पिच’ तयार करावे - सचिन

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेतील वातावरण आणि खेळपट्टी कधीच फिरकी गोलंदाजांना मदत करत नाहीत. अशा वेळी २०१०-११ मध्ये झहीर खानने एकाबाजूने गोलंदाजी करताना खेळपट्टी खराब करून हरभजनसाठी मार्ग मोकळा केला होता, तसे प्रयत्न सध्याच्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी करावेत, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी व्यक्त केली आहे. 

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीस उद्या केप टाऊन येथे सुरवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सचिनने २०१०च्या दौऱ्यात झहीरने हरभजनसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण काढली. त्या सामन्यात केप टाऊन येथेच दुसऱ्या डावात हरभजनने सात गडी बाद केले होते. झहीर आणि आफ्रिकेचा लोनवाबो त्सोत्सोबे या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या फूट स्टेप्समुळे खेळपट्टी त्या बाजूने नैसर्गिकरित्या खराब झाली होती. त्याचा फायदा हरभजनला गोलंदाजी करताना झाला होता. 

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘‘दक्षिण आफ्रिकेतील वातावरण अश्‍विनसाठी निश्‍चित आव्हानात्मक आहे. पण, भारतीय वेगवान गोलंदाजांनी अश्‍विनसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले तर अश्‍विनवरील दडपण कमी होण्यास मदत होईल.’’

सचिनने या वेळी गोलंदाजीसाठी कोहलीकडे चांगले पर्याय असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘‘तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय योग्य आहे. कोहलीकडे चौथा वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याचा चांगला पर्याय आहे. तो वेगवान गोलंदाजीबरोबर सातव्या-आठव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो.’’ अंतिम संघरचना कशी असावी याचे सर्वाधिकार संघ व्यवस्थापनाचे असतात. खेळपट्टी कशी मिळते त्यानुसार संघ व्यवस्थापन निर्णय घेत असते, असे सचिन म्हणाला.

loading image