नव्या पर्वाची चाहूल - शुभांगी कुलकर्णी

ज्ञानेश भुरे
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - भारतीय महिला अंतिम सामन्यात हरल्या असल्या तरी त्यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या या कामगिरीमुळे इथून पुढे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरवात झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पुणे - भारतीय महिला अंतिम सामन्यात हरल्या असल्या तरी त्यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या या कामगिरीमुळे इथून पुढे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरवात झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबचे मानद सदस्यत्व मिळालेल्या शुभांगी अंतिम लढत पाहण्यासाठी लॉर्डस मैदानावर उपस्थित होत्या. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे कौतुकच केले. त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय महिला संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे हीच मुळात मोठी गोष्ट आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. दोन सामने त्या हरल्या; पण त्यानंतरही त्यांनी मारलेली मुसंडी ही त्यांच्या गुणवत्तेची पावतीच म्हणता येईल. अंतिम सामन्यात दडपणाचा सामना करण्यात आपल्या खेळाडू अपयशी ठरल्या हे खरे आहे. येथे इंग्लंडचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. आपल्या संघातील खेळाडू लहान आणि अनुभवाने कमी होत्या. पण, मिताली आणि झूलन यांनी या खेळाडूंना बरोबर घेऊन जात केलेली कामगिरी नक्कीच पुढील पिढीला प्रेरणा देणारी ठरेल.’’

संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी आपली छाप पाडल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय संघाने खऱ्या अर्थाने सांघिक भावनेने इथपर्यंत मजल मारली. एखादीच खेळाडू खेळली असे कधीच जाणवले नाही. कधी पूनम राऊत, स्मृती मानधना असेल; तर कधी मिताली राज, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत फलंदाजीत चमकल्या. गोलंदाजीत त्यांना झूलन, एकता बिश्‍त, राजेश्‍वरी गायकवाड यांची साथ मिळाली. अशारीतीने प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले आहे. हरमनप्रीतची खेळी तर अतुलनीय अशीच होती. एकूण, या संघाची कामगिरी बघता भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री पटते.’’

आयसीसी महिला संघाची मिताली राज कर्णधार

लंडन - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिची सोमवारी आयसीसी महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. 
मितालीने स्पर्धेत ४०९ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध तिने केलेली १०९ धावांची खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली होती. मितालीसह हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा या अन्य दोन भारतीय खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. संघ - टमसिन बेऔमाँट (इंग्लंड ४१० धावा), लॉरा वोलव्हार्डट (द. आफ्रिका, ३२४ धावा), मिताली राज (कर्णधार, ४०९ धावा), एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया, ४०४ धावा, ९ विकेट्‌स), सारा टेलर (यष्टिरक्षक, इंग्लंड ३९६ धावा, चार झेल, दोन यष्टिचीत), हरमनप्रीत कौर (३५९ धावा, ५ विकेट्‌स), दीप्ती शर्मा (२१६ धावा, १२ विकेट्‌स), मारीझेन कॅप (द. आफ्रिका,१३ विकेट्‌स), डेन व्हॅन निएकर्क (द. आफ्रिका १५ विकेट्‌स), ॲन्या श्रुबसोल (इंग्लंड, १२ विकेट्‌स), ॲलेक्‍स हार्टली (इंग्लंड, १० विकेट्‌स) बारावी खेळाडू - नताली स्कायव्हर (इंग्लंड ३६९ धावा, ७ विकेट्‌स)

महिला क्रिकेटपटूंचा गौरव

बीसीसीआयने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा विशेष गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू बुधवारपासून टप्प्याटप्प्याने मायदेशी परतणार आहेत. महिला संघाच्या गौरव सोहळ्याची तारीख आणि ठिकाण त्यामुळे निश्‍चित करण्यात आलेले नाही. या सोहळ्यात संघातील प्रत्येक खेळाडूला रोख ५० लाख, सपोर्ट स्टाफला २५ लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी, त्यांची कामगिरी अभिमान वाटावी अशीच आहे, असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news new surprise