राष्ट्रपती ज्येष्ठ चालतात मग, पदाधिकारी का नको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव निरंजन शहा यांचा प्रश्‍न

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाधिकाऱ्यांवर लादलेली वयोमर्यादेची अट पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरू लागली आहे. याच अटीने ‘बीसीसीआय’मधून अपात्र ठरलेल्या निरंजन शहा यांनी ‘भारताचे राष्ट्रपती ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे चालतात, मग वयाची बंधने आम्हा प्रशासकांवरच का?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव निरंजन शहा यांचा प्रश्‍न

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाधिकाऱ्यांवर लादलेली वयोमर्यादेची अट पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरू लागली आहे. याच अटीने ‘बीसीसीआय’मधून अपात्र ठरलेल्या निरंजन शहा यांनी ‘भारताचे राष्ट्रपती ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे चालतात, मग वयाची बंधने आम्हा प्रशासकांवरच का?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. 

लोढा समितीने ‘बीसीसीआय’मध्ये सुधारणा मोहीम राबवताना पदाधिकाऱ्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक असू नये, अशी अट लादली आहे. या अटींबाबत विचार जाणून घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने नियुक्त केलेल्या सात सदस्यीय समितीत विशेष निमंत्रित म्हणून निरंजन शहा यांचा समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले, ‘‘बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या वयोमर्यादेबाबत अडचण काय आहे, हेच मला समजत नाही. जर आपले राष्ट्रपती सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाचे असूनही काम करू शकतात, तर मग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरच वयाचे बंधन कशासाठी?’’

जोपर्यंत व्यक्ती काम करू शकते तोवर तिला ते करून द्यायला हवे. त्यामुळेच लोढा समितीने दिलेल्या या शिफारशीला माझा विरोध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

‘बीसीसीआय’ने राजीव शुक्‍ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीची पहिली बैठक उद्या शनिवारी होणार आहे. समितीने लादलेली एक राज्य, एक मत ही शिफारसदेखील वादग्रस्त ठरत आहे. पण, शहा यांचे मत यावर वेगळे होते. ते म्हणाले, ‘‘वैयक्तिकदृष्ट्या मी या अटीच्या विरोधात नाही. पण, जेव्हा संघटनेचा प्रश्‍न येतो तेव्हा निश्‍चितपणे हे अन्यायकारक आहे. ज्या मुंबई क्रिकेट संघटनेने भारतीय क्रिकेटसाठी बहुमोल योगदान दिले त्या संघटनेचा मताचा अधिकार कसा काय काढून घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर देशातील सर्वांत जुनी संघटना म्हणून कार्यरत असलेल्या संघटनेला कसे तुम्ही दूर लोटू शकता?’’

‘बीसीसीआय’चे प्रशासक म्हणून निरंजन शहा यांनी चार दशकाहून अधिक काळ विविध पदे सांभाळली आहेत. त्यांनी ‘कुलिंग ऑफ’ या अटीचाही समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘ही अट लादण्याचा उद्देशच मला कळलेला नाही. जर, मी तीन वर्षे सहसचिव म्हणून काम पाहिले, तर पुढील टप्प्यात मी सचिवपदासाठी पात्रच ठरले पाहिजे.’’

अठरा राज्य संघटनांनी या संदर्भात अंतरिम याचिका दाखल केली आहे. यातून काही तरी सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल, अशी आशा वाटते.
- निरंजन शहा, ‘बीसीसीआय’चे माजी सचिव

Web Title: sports news niranjan shaha question to bcci