esakal | ऑस्ट्रेलियात विराटचे माझ्यासह असंख्य चाहते - क्‍लार्क
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियात विराटचे माझ्यासह असंख्य चाहते - क्‍लार्क

विराटबद्दल ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांमध्ये सकारात्मक काहीच लिहून येत नाही. कोहलीबाबत ते नेहमीच नकारात्मक लिहितात. पण, माझे त्याच्याशी चांगले संबंध आहे. तो आदर करण्यासारखाच क्रिकेटपटू आहे.
- मायकेल क्‍लार्क, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार

ऑस्ट्रेलियात विराटचे माझ्यासह असंख्य चाहते - क्‍लार्क

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने सांगितले आहे. 

ऑस्ट्रेलियात विराटचे चाहते नाहीत हे आपल्याला मान्य नाही. पण, मी स्वतः त्याचा चाहता आहे आणि त्याच्यामध्ये असलेली ऑस्ट्रेलियन आक्रमकता बघता त्याचे ऑस्ट्रेलियातही असंख्य  चाहते आहेत यात शंकाच नाही, असे क्‍लार्कने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

कोहलीबाबत आपली मते मनमोकळे पणाने मांडताना क्‍लार्क म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगतो,  तो जबरदस्त खेळाडू आहे. तो सर्वोत्तम दर्जाचे क्रिकेट खेळत आहे. तो जेवढा मैदानावर आक्रमक दिसतो, तेवढाच मैदानाबाहेरही तो चांगला माणूस आहे. मैदानावर तो जी आक्रमकता दाखवतो तो खेळाचा एक भाग झाला. ऑस्ट्रेलिया संघातील सध्याच्या खेळाडूंना ते आवडतही नसेल, पण त्याच्याबद्दल मनात नक्कीच आदर आहे.’’

ऑस्ट्रेलिया सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. याबाबत क्‍लार्क म्हणाला, ‘‘भारताला भारतात पराभूत करणे हे केव्हाही कठिण आहे, यात शंकाच नाही. त्यातच सध्याचा भारतीय संघाचा आत्मविश्‍वास दुणावलेला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा अधिकच आव्हानात्मक असेल. ऑस्ट्रेलिया संघाच्या चाहत्यांना आपला संघ जगात सर्वोत्तम आहे असेच वाटत असेल. पण, कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सर्वोत्तम ठरण्याच्या मार्गावर आहे.’’

क्‍लार्कने भारतीय संघ मायदेशात सरस असल्याचे मान्य केले असले, तरी त्याने कोहली आणि त्याच्या संघास परदेशात जिंकण्याचे आव्हान दिले आहे. तो म्हणाला, ‘‘आगामी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने विजयी मालिका कायम राखल्यास भारतीय संघ जगातही सर्वोत्तम ठरू शकेल.’’

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटपटू यांच्यामधील मानधनाचा वाद मिटल्याबद्दल देखील क्‍लार्कने समाधान व्यक्त केले. ऑस्ट्रेलियासमोर आता भरगच्च कार्यक्रम आहे. प्रथम बांगलादेश नंतर भारत आणि मग ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ खेळणार आहे. मानधनाचा वाद मिटल्यामुळे आता क्रिकेटपटूंनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही क्‍लार्कने दिला.

loading image