चुरस एकदिवसीय मालिकेची

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 December 2017

धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे.

धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे.

नवी दिल्लीतील ‘गॅस चेंबर’ ते धुलाधर पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले धरमशाला असा प्रवास भारत-श्रीलंका सामन्यांचा झाला आहे. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेतील मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले होते. आताही ३-० असे निर्भेळ यश मिळवले तर भारताला एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवता येणार आहे.

आगामी दक्षिण आफ्रिका दौरा डोळ्यांसमोर ठेवून काही प्रमुख गोलंदाजांना दिलेली विश्रांती तसेच विराटची अनुपस्थिती अशा परिस्थितीत रवी शास्त्री यांच्या संघ व्यवस्थापनाला सर्व मोहऱ्यांची व्यवस्थित जुळवणी करावी लागणार आहे; पण त्याच वेळी त्यांना रहाणेच्या फॉर्मची डोकेदुखी असणार आहे. रोहित शर्मा देशाचे प्रथमच नेतृत्व करत असला तरी त्याच्या साथीला धोनीचा अनुभव असेल ही जमेची बाजू आहे.

मायदेशात झालेली न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने जिंकली असली तरी मधल्या फळीची समस्या भेडसावली होती. त्यातच आता विराट कोहलीही नसेल. एवढेच नव्हे तर शिखर धवनला हलका ताप आलेला आहे. त्यामुळे रोहितसह रहाणे, दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि धोनी यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी फॉर्म मिळावा म्हणून रहाणेचा विचार केला जाऊ शकतो, असे सुरवातीला चित्र होते; पण धवन जर उद्या अनुपलब्ध ठरला तर रहाणेला सलामीला खेळविले जाईल. केदार, दिनेश कार्तिक यांच्या साथीला श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडे यापैकी एकाला संधी मिळू शकते. कसोटी मालिकेतील विश्रांतीनंतर पुन्हा आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालेला हार्दिक पंड्या फलंदाजी तसेच गोलंदाजीत भारतीयांची धार वाढवणारा ठरू शकतो.

थंड वातावरण असलेल्या धरमशालेतील हा सामना सकाळी ११.३० वाजता सुरू होत आहे. एकूणच सायंकाळपर्यंत वेगवान गोलंदाजांचा प्रभाव राहू शकतो आणि त्याचा फायदा घेण्यासाठी भुवनेश्‍वर कुमार, बुमरा ही जोडी प्रभावी ठरू शकते. पंड्या तिसरा वेगवान गोलंदाज असेल; मात्र फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, अक्षर पटेल या दोघांना किंवा दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

कसोटी मालिकेत भारताला कोलकता आणि दिल्लीत विजयापासून दूर ठेवणाऱ्या श्रीलंका संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. दिल्लीतील सामन्यात दुसऱ्या डावात शतक करणारा धनंजया सिल्वा तसेच अनुभवी अँजेलो मॅथ्यूज, कर्णधार तिसारा परेरा, उपुल थरांगा भारताला डोईजड ठरू शकतात.

केदारला दुखापत
शुक्रवारी सराव करताना केदार जाधवच्या डाव्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे तो मालिकेत खेळू शकणार नाही. वॉशिंग्टन सुंदर बदली खेळाडू असेल. केदारच्या स्कॅन चाचण्या होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news one day cricket competition