खेळाडूंनो, संधीचा फायदा उठवा - पी. के. बॅनर्जी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 September 2017

विश्‍वकरंडक स्पर्धेत आफ्रिकन देश शारीरिकदृष्ट्या एक पाऊल पुढे असतीलही, पण फुटबॉल हा खेळ कौशल्य आणि तंत्राचा आहे. विजेतेपदासाठी माझी पसंती जर्मनीला असेल. कौशल्य आणि तंत्राच्या आघाडीवर ते सर्वोत्तम आहेत.
- पी. के. बॅनर्जी

कोलकाता - पुढील महिन्यापासून भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा फायदा भारताने देशातील फुटबॉल प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे, असे मत भारताचे माजी फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी खेळाडूंनाही संधीचा फायदा घ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करा, असा सल्ला दिला.

विसाव्या शतकातील भारताचे सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ‘फिफा’ने बॅनर्जी यांचा गौरव केला होता. ते म्हणाले, ‘‘भारतीय संघातील खेळाडूंनी यापूर्वी काय कामगिरी केली ती मी पाहिलेली नाही. पण, ते भारतीय फुटबॉलचे भविष्य आहे आणि आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा.’’

भारताला फुटबॉलचा देश म्हणून जर ओळख मिळवायची असेल, तर त्यांनी या स्पर्धेचा फायदा करून घ्यायला हवा, असे सांगतानाच ते म्हणाले, ‘‘भारताने १७ आणि १९ वर्षांखालील अधिकाधिक खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे दुसरी फळी भक्कमपणे उभी राहील आणि संघ निवडीसमोर पर्याय उभे राहतील. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर लगेच या मोहिमेला सुरवात व्हायला हवी.’’
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारतीय संघ सात वेळा खेळला, पण पहिल्या फेरीपुढे जाऊ शकलेला नाही. बॅनर्जी म्हणाले, ‘‘इतिहास बदलू शकत नाही. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे वाटते. विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात होत आहे हीच अभिमानाची बाब आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news p. k. banerjee talking