पुण्यातील सामन्याआधी "पिच फिक्‍सिंग'चा वाद 

सुनंदन लेले
Thursday, 26 October 2017

पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिक मोबदल्यासाठी हवी तशी खेळपट्टी बनवण्याची कबुली दिली आणि सामना सुरू होण्यापूर्वी ही "ब्रेकिंग न्यूज' झाली. 

पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिक मोबदल्यासाठी हवी तशी खेळपट्टी बनवण्याची कबुली दिली आणि सामना सुरू होण्यापूर्वी ही "ब्रेकिंग न्यूज' झाली. 

वाहिनीच्या या सनसनाटी "स्टिंग ऑपरेशन'मुळे निर्माण झालेली "ब्रेकिंग न्यूज' पुढे जाऊन सामना रद्द होण्यापर्यंतच्या चर्चेपर्यंत रंगली. "बीसीसीआय'चे पदाधिकारी अमिताभ चौधरी तसेच सौरभ गांगुली यांनीदेखील हा खुलासा गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिल्याने वातावरण अधिकच चिंताजनक बनले. सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार असला, तरी चाहत्यांची वाहने गुहंजेचा रस्ता सकाळी अकरापासूनच धरू लागली होती. अशाच मोक्‍याच्या वेळी ही बातमी धडकल्याने चाहत्यांच्या मनातदेखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मैदानात पोचेपर्यंतच सामना होणार की नाही याचीच चर्चा रंगू लागली. चौकशीसाठी पत्रकारांचे मोबाईल खणखणू लागले होते. काही तरी घडणार, गर्दी होणार या भीतीने चाहते हातचे काम सोडून मिळेल तसे लगबगीने मैदानावर पोचू लागले. 

या दरम्यान, आयसीसीचे निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टीची कसून पाहणी करून त्यात काही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. सामना नियोजित वेळेतच खेळविला जाणार याची त्यांनी घोषणा केली. एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना या घोषणेने दिलासा दिला. मैदानावर लगबगीने पोचलेल्या चाहत्यांना पोचताच क्षणी सामना होण्याची बातमी कळल्याने त्यांनादेखील हायसे वाटले; पण तोपर्यंत साळगावकरांनी टाकलेला "नो-बॉल' सर्वांचेच धाबे दणाणून गेला. 

नेमके काय घडले 
एका वाहिनीच्या पत्रकारांनी सट्टेबाज असल्याचे सांगत क्‍युरेटर पांडुरंग साळगावकरांशी संपर्क साधला. "आम्हाला हवी तशी खेळपट्टी बनवलीत, तर चांगला मोबदला देऊ' असे आमिष दाखवल्यावर साळगावकर त्याला बधले आणि त्यांच्या सनसनाटी वक्तव्याने क्षणार्धात दुसरा एकदिवसीय सामना अडचणीत आला. साळगावकरांनी हे सगळे करताना आपल्या वर्तनाची हद्द ओलांडली. त्यांनी नियमबाह्य पद्धतीने त्या डमी पत्रकारांना पायात बूट असूनही खेळपट्टीवर नेले. त्याच वेळी डमी पत्रकार आणि साळगावकर यांच्यात आर्थिक मोबदल्याची चर्चा झाली आणि ते वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडियोवरून स्पष्ट दिसले. वाहिनीने आपले पत्रकार साळगावकरांना बुकी म्हणून भेटल्याचे स्पष्ट केले. आयसीसीच्या नियमानुसार सामन्यापूर्वी ठराविक व्यक्तींखेरीज कुणालाही खेळपट्टीजवळही फिरकू दिले जात नाही. साळगावकर मात्र त्या दोघांना खेळपट्टीपर्यंत घेऊन गेले होते. त्याचबरोबर भविष्यातील सामन्यातही खेळपट्टीबाबतची माहिती देण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Pitch fixing