सॉरी... आई-बाबा, मी तुमच्यासोबत येणार नाही

गुरुवार, 27 जुलै 2017

मुंबई - सॉरी, आई-बाबा, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. काय करणार खूपच बिझी कार्यक्रम आहे, पूनम राऊतला भल्या पहाटे आपल्याला नेण्यासाठी विमानतळावर आलेले आई-वडील आपल्याविनाच परत जाणार, याचे दुःख होते; पण संघाच्या झालेल्या जोरदार स्वागताचाही आनंद होत होता. 

मुंबई - सॉरी, आई-बाबा, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. काय करणार खूपच बिझी कार्यक्रम आहे, पूनम राऊतला भल्या पहाटे आपल्याला नेण्यासाठी विमानतळावर आलेले आई-वडील आपल्याविनाच परत जाणार, याचे दुःख होते; पण संघाच्या झालेल्या जोरदार स्वागताचाही आनंद होत होता. 

विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय महिला संघाचे आज पहाटे जल्लोषात स्वागत झाले. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांनी खूपच गर्दी केली होती. या उपविजेत्या खेळाडूंचे फोटो काढण्यासाठी चाहत्यांत चढाओढ झाली. खेळाडूंना विमानतळावरच ओवाळण्यात आले, तसेच टिळाही लावण्यात आला. चाहत्यांत अर्थातच अनेक माजी खेळाडू होत्या. खेळाडू विमानतळाबाहेर आल्यावर त्यांचे जल्लोषात टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले, तसेच अनेकांनी इंडिया... इंडिया... असा गजर केला. या चाहत्यांत अंतिम सामन्यात मोलाची पाऊणशतकी खेळी केलेल्या पूनम राऊतचे आई-वडीलही होते. 

पूनम जेव्हा कधी दौऱ्यावरून परत येते, त्या वेळी आम्ही तिला न्यायला येतो. यापूर्वी ती आमच्याबरोबर कधी निघाली तेही कळत नसे. या वेळी एवढी गर्दी आम्ही अपेक्षित केली नव्हती, असे पूनमचे वडील गणेश राऊत यांनी सांगितले. पूनम नेहमीप्रमाणे आई-वडिलांसोबत न येता संघासोबत हॉटेलवर गेली. तिथेच तिची आई-वडिलांबरोबर भेट झाली. ‘‘सॉरी, आई-बाबा, मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. आमचे शेड्यूल खूपच बिझी आहे. पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला जायचे आहे. त्यानंतरही अनेक कार्यक्रम आहेत. दोन दिवसांत नक्की परत येईन, सॉरी, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही,’’ असे पूनमने तिच्या आई-वडिलांना सांगितले. 

संघातील प्रत्येक खेळाडूस जोरदार स्वागताची अपेक्षा नव्हती. यापूर्वी आम्ही २००५ मध्ये उपविजेते होतो, पण आता मंडळाचा भाग आहोत, त्यामुळे फरक हा दिसणारच, असे मितालीने जोरदार स्वागताबद्दल सांगितले. हे स्वागत सर्वच खेळाडूंना भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणादायक ठरेल, असे तिने सांगितले.