‘वाडा’कडून क्रिकेटपटूंची चाचणी होऊ शकते - राठोड

पीटीआय
Monday, 20 November 2017

बाहेरच्या संस्थेने क्रिकेटपटूंची चाचणी घेण्यास आमची हरकत नाही; पण देशातील राष्ट्रीय क्रीडा संघटना ‘नाडा’वर (राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था) विश्‍वास दाखवत असतील, तर क्रिकेटपटूंनीदेखील तो दाखवला तर बिघडले कुठे ?
- राज्यवर्धनसिंह राठोड,  केंद्रीय क्रीडामंत्री

नवी दिल्ली - क्रिकेटपटू आणि उत्तेजक चाचणी हा वाद अजून सुटलेला नाही. ‘बीसीसीआय’ने यास ठाम विरोध केला असला तरी, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी रविवारी ‘आयसीसी’ जर ‘वाडा’कडून क्रिकेटपटूंची चाचणी घेणार असले तर त्याला आमची हरकत नसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

‘बीसीसीआय’ ही राष्ट्रीय क्रीडा संघटना नाही, त्यामुळे ‘नाडा’ची बंधने आम्हाला लागू होत नाहीत, अशी भूमिका ‘बीसीसीआय’ने घेतली आहे. ‘वाडा’ने त्यांची ही भूमिका फेटाळली आहे. त्यामुळे ‘नाडा’च्या मान्यतेचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे.

दिल्ली अर्ध मॅरेथॉनच्या वेळी बोलताना राठोड यांनी या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले,‘‘आमच्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहते हे तिघे महत्त्वाचे आहेत. जेव्हा खेळाडू उत्तेजकाची मदत घेतात, तेव्हा चाहत्यांची फसवणूक होते. आज उत्तेजकाचा प्रश्‍न सर्व क्रीडा संघटनांना भेडसावत आहे. क्रिकेटही त्याला अपवाद नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी ‘वाडा’कडून होणार असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करू.’’

‘आयसीसी’ने ‘वाडा’चे सदस्यत्व घेतले आहे, त्यामुळे ‘वाडा’ने काय तो निर्णय घ्यावा, असे सांगून राठोड म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘वाडा’चे सदस्यत्व घेतले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्यास बांधिल आहे. ‘वाडा’ने भारतीय क्रिकेटपटूंची चाचणी घेतल्यास आमची हरकत असण्याचा प्रश्‍नच येत नाही. क्रिकेटपटूंची चाचणी कुठे आणि कशी घ्यायची, हे ‘आयसीसी’ने ठरवावे.’’

विशेष म्हणजे ‘आयसीसी’ आणि ‘वाडा’ यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे प्रत्येक क्रिकेटपटूने दर तीन महिन्यांनी चाचणीसाठी उपलब्ध असणे बंधनकारक आहे आणि त्यांनी आपण केव्हा आणि कुठे उपलब्ध होऊ हे सांगणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Rajyavardhan Singh Rathore Union Sports Minister BCCI cricket