गुहा यांचा प्रशासक समितीचा राजीनामा

पीटीआय
शुक्रवार, 2 जून 2017

नवी दिल्ली - बीसीसीआयच्या कारभारासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचे सदस्य रामचंद्र गुहा यांनी वैयक्तिक कारणास्तव समितीचा राजीनामा दिला. परंतु, त्याचा संबंध अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदाच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या घटनांशी जोडला जात आहे.

नवी दिल्ली - बीसीसीआयच्या कारभारासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचे सदस्य रामचंद्र गुहा यांनी वैयक्तिक कारणास्तव समितीचा राजीनामा दिला. परंतु, त्याचा संबंध अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदाच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या घटनांशी जोडला जात आहे.

रामचंद्र गुहा यांनी आपला राजीनामा सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, ते सदस्य असलेल्या क्रिकेट प्रशासक समितीलाही धक्का बसला. समितीतील इतर कोणत्याही सदस्यांशी चर्चा न करताच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे; परंतु समितीचे प्रमुख विनोद राय यांना आपण सूचित केल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.

गुहा यांच्या राजीनाम्याबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. त्यांनी आम्हाला याची कल्पना दिली नव्हती. आम्हाला ही बातमी मीडियातूनच समजली, असे प्रशासन समितीतील एका सदस्याने सांगितले. गुहा हे इतिहासकार असून, अगोदरपासून अध्ययनविषयक त्यांच्या काही जबाबदाऱ्या निश्‍चित झाल्या होत्या. या कामामुळे ते प्रशासन समितीच्या जवळपास अर्ध्या बैठकांना उपस्थित राहू शकले नव्हते.

अनिल कुंबळे यांच्याशी गुहा यांची जवळीक होती आणि सध्या कुंबळे यांच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या वादावरून ते नाराज असल्याची चर्चा होती. कुंबळे प्रकरणावरून त्यांचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशीही वाद झाल्याचे बोलले  जात आहे. 

क्रिकेटच्या इतिहासाबाबत त्यांचे ज्ञान सखोल आहे. पण, बीसीसीआय असो की आयसीसीशी संबंधित घडामोडी असो; क्रिकेटचे प्रशासन चालवणे ही वेगळी गोष्ट आहे. विनोद राय यांच्यासह विक्रम लिमये यांनाही प्रशासन चालवताना अडचणी येत आहेत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

भारतीय खेळाडूंच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मानधन रचनांमध्ये गुहा यांचा वाटा अधिक होता. खेळाडूंना अधिक मानधन मिळण्यासाठी कुंबळेने पुढाकार घेतलेला आहे. आता कुंबळेसाठीच पुढील वाटचाल कठीण झालेली आहे.

बीसीसीआयकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने गुहा यांनी समितीतून बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचाही एक मतप्रवाह आहे.
इतिहासकाराबरोबर गुहा यांनी ‘विकेट इन दी ईस्ट’ आणि ‘कॉर्नर ऑफ फॉरेन फिल्ड’ अशी पुस्तके लिहिलेली आहेत. आयपीएलचे ते टीकाकारही  होते.

Web Title: sports news ramchandra guha cricket