मुंबईला पाचशे व्होल्टचा झटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 November 2017

मुंबई - ज्या खडूसपणाचे (कधीही हार न पत्करणारे) दाखले माजी खेळाडूंनी देऊन काही तासच होत नाहीत तोच मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यांच्यावर  बडोद्याविरुद्ध अवघ्या १७१ धावांत गारद होण्याची वेळ आली. ऐतिहासिक ५०० व्या रणजी सामन्यात मुंबईला पहिल्याच दिवशी पाचशे व्होल्टचा झटका बसला. त्यानंतर दिवसअखेर बडोद्याने १ बाद ६३ अशी सुरवात केली.

मुंबई - ज्या खडूसपणाचे (कधीही हार न पत्करणारे) दाखले माजी खेळाडूंनी देऊन काही तासच होत नाहीत तोच मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यांच्यावर  बडोद्याविरुद्ध अवघ्या १७१ धावांत गारद होण्याची वेळ आली. ऐतिहासिक ५०० व्या रणजी सामन्यात मुंबईला पहिल्याच दिवशी पाचशे व्होल्टचा झटका बसला. त्यानंतर दिवसअखेर बडोद्याने १ बाद ६३ अशी सुरवात केली.

अजित वाडेकरांपासून सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत महान खेळाडूंनी रणजी क्रिकेटमध्ये प्रतिकूल परिस्थिती आल्यावर कसा खेळ केला याची उदाहरणे दिली. तेव्हा मुंबई या विद्यमान संघासह बडोद्याचाही संघ उपस्थित होता. परंतु आज प्रत्यक्ष मैदानावर त्या अनुभवकथनाचा बडोदेकरांनीच अधिक फायदा घेतला. वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी साखळी सामन्याच्या पहिल्या दिवसाचे हे चित्र होते.

अजिंक्‍य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हरहुन्नरी पृथ्वा शॉ अशी भरभक्कम फलंदाजी असलेला मुंबई संघ पहिल्याच दिवशी चहापानाला ५६ षटकांत गारद झाला. याचे श्रेय प्रत्येकी पाच विकेट घेणाऱ्या बडोद्याच्या अतित सेठ आणि मेरीवाला यांना जाते. कर्णधार आदित्य तरेचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य कोणालाही खडूसपणा दाखवता आला नाही.

सकाळचे काहीसे थंड वातावरण, नवा कोरा चेंडू स्विंग होणार हे स्वाभाविक होते, पण सलग दोन सामन्यांत दोन शतके करणारा पृथ्वी शॉ आणि भारतीय संघाचा सर्वांत भरवशाचा कसोटीवीर अजिंक्‍य रहाणे शून्यावर बाद झाले. तेथेच मुंबईच्या फलंदाजीचा फ्यूज उडाला. सेठने ‘बर्थ डे बॉय’ शॉची मधली यष्टी उखडली; तर रहाणेला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले.

रहाणेचा हा सलग दुसरा भोपळा आहे. ओडिशाविरुद्ध तो शून्यावर बाद झाला होता. २ बाद ५ ही सुरवात धक्कादायक असली, तरी अशा परिस्थितीतून अनेकदा मार्ग काढण्यात आला आहे. नुकताच भारतीय संघात खेळलेला श्रेयस अय्यर, अनुभवी सूर्यकुमार यादव आणि गेल्या सामन्यात शतक करणारा सिद्धेश लाड असे फलंदाज असल्यामुळे चिंता करण्याचे कारण नव्हते. दुसऱ्या बाजूला सलामीला खेळणारा तरे भक्कम फलंदाजी करत आत्मविश्‍वास देत होता, पण मधल्या फळीचे हे तिन्ही फलंदाज चांगली सुरवात केल्यांतर केवळ संयम नसल्यामुळे यष्टीच्या पाठीमागे झेल देऊन बाद झाले. श्रेयसने तर त्यानंतर क्षेत्ररक्षणात स्लीपमध्ये आदित्य वाघमोडेचा झेलही सोडला.

मुंबईच्या शंभर धावा झाल्या. यामध्ये तरेचा वाटा अर्धशतकाचा होता, पण तोही उपाहाराला काही मिनिटेच असताना बाद झाला, त्या वेळी मुंबईची परिस्थिती ५ बाद १०३ अशी झाली होती. त्या वेळी दीडशे धावाही कठीण वाटत होत्या, परंतु धवल कुलकर्णी आणि विजय गोहिल या गोलंदाजांनी नवव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली आणि मुंबईला १७१ धावा करता आल्या.

रहाणे कर्णधाराच्या भूमिकेत
मुंबईकडून कर्णधार म्हणून तरे मैदानात गेला होता, परंतु मुंबईचे क्षेत्ररक्षण सुरू झाल्यावर रहाणेच गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररचना करत होता.

संक्षिप्त धावफलक- मुंबई - ५६.२ षटकांत सर्व बाद १७१ (आदित्य तरे ५०, श्रेयस अय्यर २८, सिद्धेश लाड २१, नायर १०, धवल कुलकर्णी १७, विजय गोहिल १६, अतित सेठ ५-५०, लुकमान मेरीवाला ५-५२) वि. बडोदा, पहिला डाव - २६ षटकांत १ बाद ६३ (आदित्य वाघमोडे खेळत आहे १५, विष्णू सोलंकी खेळत आहे, ३२ रॉयस्टन डायस १-१५).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji cricket competition