esakal | अंकित बावणेच्या खेळीने महाराष्ट्राचा डाव सावरला
sakal

बोलून बातमी शोधा

गहुंजे (पुणे) - रेल्वेविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या रणजी लढतीत महाराष्ट्राचा डाव सावरणारा कर्णधार अंकित बावणे ड्राइव्ह करताना.

अंकित बावणेच्या खेळीने महाराष्ट्राचा डाव सावरला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कर्णधार अंकित बावणेच्या खेळीने रणजी करंडक सामन्यात महाराष्ट्राला रेल्वेविरुद्ध पहिल्या दिवसअखेरीस ५ बाद २४९ धावांची मजल मारणे शक्‍य झाले. खेळ थांबला तेव्हा रोहित मोटवानी ५२, तर चिराग खुराणा १ धाव काढून खेळत होते. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने जबाबदारी ओळखून केलेली फलंदाजी आणि केलेल्या दोन पूरक भागीदारी हेच पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या सगळ्या डावात बावणेला मात्र शतकापासून वंचित राहावे लागले. खेळ संपण्यास दोन षटकांचा अवधी असतानाच बावणे शिवकांत शुक्‍लाकडे झेल देऊन बाद झाला. त्याने १८४ चेंडूंत १२ चौकार, एका षटकाराच्या साहाय्याने ९२ धावा केल्या.

कर्नाटकविरुद्धच्या सामन्याची सुरवात लक्षात घेत रेल्वे कर्णधार महेश रावत याने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हर्षद खडीवाले आणि स्वप्निल गुगळे या दोन्ही सलामीवीरांना डावलण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यांच्या जागी या वेळी ऋतुराज गायकवाड आणि मुर्तझा ट्रंकवाला जोडीने डावाची सुरवात केली. सलामीची जोडी बदलल्यानंतरही चित्र फारसे काही वेगळे दिसले नाही. ऋतुराज आणि मुर्तझा यांनी सावध सुरवात केली. त्यानंतरही त्यांना संयम राखता आला नाही. त्यामुळे रेल्वेचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरणार असेच चित्र दिसू लागले. ठराविक अंतराने ट्रंकवाला, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड हे महाराष्ट्राचे प्रमुख फलंदाज पाऊणशेच्या आतच तंबूत परतले. प्रथम ट्रंकवाला बाद झाला.

त्यानंतर आक्रमक सुरवात करणारा राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज बाद झाले.
त्यानंतर खेळायला आलेल्या अंकित बावणेने महाराष्ट्राच्या डावाला आधार दिला. त्याला प्रथम नौशाद शेखची साथ मिळाली. उपाहारापर्यंत त्यांनी महाराष्ट्राला शतकी मजल मारून दिली. ही जोडी रंगत असतानाच अमित मिश्राने रेल्वेला ‘ब्रेक थ्रू’ मिळवून देताना नौशादची विकेट मिळविली. त्या वेळी महाराष्ट्राच्या डावाची स्थिती नाजूक नव्हती, पण भक्कमही नव्हती. अशा वेळी बावणे टिच्चून उभा राहिल्यामुळेच महाराष्ट्राचा डाव सावरला गेला. त्याने रोहित मोटवानीला विश्‍वासात घेत महाराष्ट्राचा डाव बांधला. 

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव ९० षटकांत ५ बाद २४९ (अंकित बावणे ९२ -१८४ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, रोहित मोटवानी खेळत आहे ५२, नौशाद शेख ३७, अमित मिश्रा २-४८, करण ठाकूर २-५२).

loading image