लाड, नायरची चिवट झुंज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 November 2017

मुंबई - पाचशेव्या रणजी लढतीत मुंबईची हार टाळण्याच्या आशा अजिंक्‍य रहाणेवर होत्या; पण त्याने निराशा केली आणि मग त्याच्याऐवजी फलंदाजीस आलेल्या सिद्धेश लाडने आपल्या चिवट खेळीने सहकाऱ्यांना प्रेरित केले. त्यामुळे बडोद्यास मुंबईची शंभरी भरवता आली नाही.

मुंबई - पाचशेव्या रणजी लढतीत मुंबईची हार टाळण्याच्या आशा अजिंक्‍य रहाणेवर होत्या; पण त्याने निराशा केली आणि मग त्याच्याऐवजी फलंदाजीस आलेल्या सिद्धेश लाडने आपल्या चिवट खेळीने सहकाऱ्यांना प्रेरित केले. त्यामुळे बडोद्यास मुंबईची शंभरी भरवता आली नाही.

वानखेडे स्टेडियमवर रहाणे परतला, त्या वेळी ४८.१ षटकात मुंबईची अवस्था ५ बाद १२५ अशी होती; पण त्यानंतर मैदानात आलेल्या सिद्धेश लाडने १२०.४ षटकानंतर खेळ थांबवला जाईपर्यंत आपली विकेट गमावली नाही. ७२.३ षटकांच्या या खेळातील २३८ चेंडू तो खेळला. त्याचबरोबर त्याने सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, तसेच धवल कुलकर्णीच्या साथीत बडोद्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

सिद्धेश व त्याच्या साथीदारांनी किती धावांची भागीदारी केली, त्यापेक्षा किती षटके खेळून काढली हे महत्त्वाचे ठरले. सिद्धेश व सूर्यकुमार यादवने ७९ धावांची भागीदारी करताना २८.५ षटके झुंज दिली, तर नायर-लाडने ३२.५ षटके लढताना ५० धावा जोडल्या. लाड-धवलने १०.५ षटकात केवळ सहा धावा केल्या. हे सर्व लक्षात घेतल्यास मुंबईच्या डावातील ३९ षटके निर्धाव झाली, यात अनपेक्षित काहीच नव्हते.

लाडने मुंबईची प्रतिष्ठा राखण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने नऊ बडोदा गोलंदाजांना क्वचितच संधी दिली. त्याच्या चिवटपणामुळेच मुंबईला एक गुण मिळवता आला. सूर्यकुमार यादवला बाद करून आत्मविश्‍वास परत मिळवलेल्या बडोद्यास लाडने खच्ची केले. साडेतीन तासांच्या या खेळीत त्याच्या पाठदुखीने दोनदा डोके वर काढले. त्याने उपचार करून घेतले; पण मैदान सोडले नाही. तो एकदाच चकला, त्या वेळी बाद झाला; पण तो नो बॉल ठरला. या टप्प्यात लाडने अनेकदा त्याची बॅट चेंडूपासून अखेरच्या क्षणास दूर केली. त्याच्या आणि नायरच्या खडूसपणामुळे मुंबईने हार टाळली. 

संक्षिप्त धावफलक -
मुंबई, पहिला डाव - १७१ आणि दुसरा डाव - ७ बाद २६० (पृथ्वी शॉ ५६, अजिंक्‍य रहाणे ४५-१३४ चेंडूत ४ चौकार, सूर्यकुमार यादव ४४-१३२ चेंडूत ४ चौकार, सिद्धेश लाड नाबाद ७१-२३८ चेंडूत ७ चौकार, अभिषेक नायर ८-१०८ चेंडू, धवल कुलकर्णी नाबाद २-३१ चेंडू, स्वप्नील सिंग २-५५, कार्तिक काकडे २-५०)  बडोदा, पहिला डाव - १८० षटकांत ९ बाद ५७५ घोषित.

पाचशेव्या सामन्यात हार टाळण्याचेच लक्ष्य होते. त्यासाठी प्रत्येक चेंडू काळजीपूर्वकच खेळायला हवा होता. एकाग्रता कायम राखणेही आवश्‍यक होते. अभिषेक नायर, तसेच धवल कुलकर्णीने अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत लढत दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीही विश्‍वास होता. आम्ही आजची मोहीम यशस्वी केली याचे समाधान आहे.
- सिद्धेश लाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji cricket competition